बुधवार, १ जानेवारी, २०२५

उज्जैनची सफर

 

इंदौरला जायला आम्ही मुंबईहून संध्याकाळी मुंबई सेंट्रल वरून अवंतिका एक्सप्रेस मध्ये बसलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इंदौरला वेळेवर पोचलो . स्टेशन वर आमच्या आधीच वृषाली आम्हाला घ्यायला हजार होती . एकमेकांना आनंदाने भेटलो . मिठया वगैरे झाल्या आणि तिच्यासोबत बाहेर पडलो . आम्ही इंदौरला पोचल्या पोचल्या गरमागरम पोहे जिलेबीचा नाश्ता करून उज्जैनला जायला रवाना झालो ....

बाहेर झक्कास वातावरण होतं म्हणून आम्ही विशेष खुशीत होतो ..... पण कसचं काय .... गाडीच्या समोरच्या काचेवर एक टप्पोरा थेंब पडला आणि म्हणता म्हणता धो धो कोसळायला लागला पाऊस .... आम्हाला एवढं उत्साही पाहूनच पावसालाही आमची सोबत कराविशी वाटली असेल ....
आम्ही आपले उज्जैनला नसेल पाऊस असं स्वतःचं समाधान करत होतो .... पण पावसाचा उत्साह आमच्या पेक्षा दांडगा होता. उज्जैनलाही आमची साथ सोडली नाही त्याने .... कारण " साथी है खुबसूरत ये पाऊस को भी खबर था" ....
मग काय , आम्ही चार आणि छत्र्या दोन ... मग आम्ही देखील " हम दो एक एक छत्री के नीचे और बारीश आ जाये " स्टाईलमध्ये देवळं पाहिली ....

चिंतामण गणपतीला सांगून घेतलं बाबारे पाऊस थांबूदे ... पण पावसाने कदाचित आमच्यापेक्षा जास्त कळकळीने सांगून घेतलेलं ... राहिलाच तो आमच्या सोबत ....
मंगलनाथ मंदिराच्या मंगळ देवाने मात्र आमचं गार्‍हाणं ऐकलं .... अहो ऐकेल नाहीतर काय ? तिथे माझे आणि प्रियाचे पाय ओल्या फरशीवरून सटकले आणि आम्ही मंगलनाथाला साष्टांग लोटांगण घालता घालता वाचलो .... मग तिथल्या एकाने सांगितलं " वो काले पत्थर पर पैर मत रख्खो .. फिसलन होती है " त्यामुळे मंजिरी आणि वृषालीचं लोटांगण मात्र राहूनच गेलं ..... पण आमचा हा निर्मळ, निर्व्याज , भक्तिभाव पाहून तोपर्यंत मंगळदेव प्रसन्न झाला होता .... कारण पावसाने त्यानंतर लगेच दडी मारली .....

तिथून आम्ही गढकालिका मंदिर पहायला गेलो ... इथली कालीमातेची मूर्ती हसरी होती.... आम्हाला भेटून तिला फारच आनंद झालेला .... चार देवींच्या एकत्र दर्शनाचा दुर्मिळ योग सर्वांना नाही मिळत नं ....

मग भर्तृहरीच्या गूंफा आणि नवनाथ मंदिर पाहिलं ....
इथे पायर्‍या उतरताना मधोमध गलेलठ्ठ, हुप्पे वानर बसले होते ..... जीव मुठीत धरुन उतरलो ... आम्हालाही त्यांच्यातलाच एक समजून परत जायलाच दिलं नसतं तर काय घ्या ! तसं झालं असतं तर फेसबूकवरच्या अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला असता. पण कदाचित फेसबूक मित्रांची पुण्याई कमी पडली किंवा आम्ही काही वानरांना त्यांच्या एवढे देखणे वाटलो नाही ... कारण काही का असेना ..... अज्जीबात त्रास दिला नाही त्यांनी आम्हाला .....

नंतर एका छानशा हाॅटेलमध्ये जेवून आम्ही महाकालेश्वरला गेलो .... प्रचंड गोल, गोल , सरळ, आडव्या, तिडव्या , वेड्यावाकड्या अशा सर्व प्रकारे जाणार्‍या रांगेत जवळ जवळ तासभर उभं राहुन एकदाचे देवळाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ पोचलो ...
पण आमच्याकडे पर्सेस आणि मोबाईल असल्याने आत सोडेनात .... तिथे असलेल्या लाॅकर्ससाठीही खूप मोठी लाईन होती ....
शेवटी वृषाली आम्हा तिघींच्या पर्सेस घेवुन एकटीच बाहेर उभी राहिली आणि म्हणूनच आम्हाला दर्शन घेता आलं ....

तिथुन दर्शन झाल्यावर जे बाहेर पडलो ते देवळाच्या मागच्या बाजुने ... आता वृषालीला भेटायचं कसं ? विचारलेला प्रत्येकजण आम्हाला रांगेचा रस्ता दाखवत होता ... परत रांगेत उभं रहावं लागणार की काय या विचारानेच धडकी भरली ... मोबाईल्सही नाहीत .... पण शेवटी कसंबसं इथून तिथून रस्ता शोधत पोचलो एकदाचे वृषाली जवळ .....
आणि मग आमची स्वारी निघाली back to Indore ......
तर असा होता आमचा उज्जैन मधला पहिला दिवस ....

 सातव्या दशकातील उज्जैनचा राजा भर्तृहरी . हाच नवनाथांच्या परंपरेतला सहावा नाथ भर्तृहरीनाथ ....

एका आख्यायिके नुसार एकदा एका साधुपुरुषाने त्याला जरामरण हरण करणारे अमूल्य असे एक फळ भेट केले .
राजाने ते अत्यंत प्रेमाने आपल्या प्राणप्रिय राणीला दिले. पण राणीचे मन राज्यातील महापालावर जडले होते. तिने ते त्याला दिले. त्या महापालाची प्रेयसी मात्र राजा भर्तृहरीच्याच महालातील एक दासी होती, त्याने ते फळ त्या दासीला दिले. आणि त्या दासीचे आपल्या राजावर निस्सीम प्रेम होते म्हणून तिने ते राजाला अर्पण केले . आपण आपल्या प्रिय राणीला दिलेले फळ अशाप्रकारे दासीकडून आपल्यालाच परत मिळालेले पाहून भर्तृहरी आश्चर्यचकित होतो .
यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता
साप्यन्यमिच्छति जनं स जनो s न्यसक्त :
अस्मद्कृते च परिशुष्यति काचिदन्या
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ।।
( जिचा (राणीचा) मी सतत विचार करतो तिच्या मनात माझ्याबद्दल कोणतीच भावना नाही
तिला जो आवडतो तो देखील दुसऱ्याच कुणावर तरी आसक्त आहे
आणि माझ्यासाठी मात्र कुणीतरी तिसरीच झुरते आहे.
तिचा , त्याचा , ह्या मदनाचा , हीचा आणि माझा धिक्कार असो )
अशाप्रकारे चौकशीअंती भतृहरीला खरं कारण कळतं तेव्हा तो अतिशय व्यथित होतो . राज्यकारभारातून त्याचे मन उडतं आणि त्याला निराशा येते .... त्याला या जगाचा वीट येतो आणि तो राज्य सोडून वनात जाऊन तपस्या करतो. याच काळात तो नितीशतक , शृंगारशतक आणि वैराग्यशतक ह्या संस्कृत भाषेतील प्रसिद्ध शतकत्रयीची रचना करतो .

आम्ही उज्जैनला भर्तृहरीच्या गुंफा पाहायला गेलो तेव्हा भर दुपारची वेळ होती. तरीही सगळ्याच गुंफा काळोख्या, कोंदट, घुसमट वाढवणाऱ्या. एक गूढ वातावरण होतं तिथे . बऱ्यापैकी गर्दी असूनसुद्धा कधी एकदा तिथून बाहेर पडतो असं वाटलं . फोटो काढणं कुठेही allowed नव्हतं .
शेजारीच नवनाथ मंदिर होतं .
१) मत्स्येंद्रनाथांनी नाथ संप्रदायाचा पाया घातला आणि २) गोरखनाथ ३) जालंदरनाथ ४) कानिफनाथ ५) गहिनीनाथ ६) राजा भर्तृहरी ( भर्तृहरीनाथ ७) रेवानाथ ८) चरपितानाथ आणि ९) नागनाथ यांनी तो पुढे नेला ...
इथेही मंदिरात बाहेरचे फोटो काढले पण आतला दत्ताच्या मूर्तीचा फोटो चांगला उजेड असूनही काळोखाच आला आहे .
मंदिराच्या परिसरात अनेक तांत्रिक साधू होते पण ते आपल्यातच मग्न होते .
तरीही वातावरणातले भारावलेपण जाणवत होतेच .

© नयना पिकळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताडोबा - जंगल सफारी

   ह्यावर्षीच्या जीवघेण्या उकाड्यात कुठे बाहेर जाणं तर सोडाच पण घरच्या घरीही गरमीचा त्रास सहन होत नाही. अशातच जर नागपूरला जायचा बेत ठरत असेल...