आजवर तीन चार वेळा तरी परदेश वाऱ्या झाल्या असल्याने परदेश गमनाबद्दल काही खूप कुतूहल नव्हतं . पण तरी शेवटी अमेरिका ती अमेरिकाच हे तिथे जाऊन आल्यावर पटलं . अनेकांना अमेरिकेचं सुप्त आकर्षण का असत हे तिथे गेल्यावरच कळतं . मला दिसलेली , मी अनुभवलेली अमेरिका मी तुम्हाला सांगणार आहे . तुमची मतं तुमच्या वैयक्तिक अनुभवानुसार वेगळी असू शकतात . पण हि माझ्या नजरेने , मनाने टिपलेली अमेरिका आहे .
साधारण दोन वर्षांपूर्वी माझ्या लेकाने , अर्चितने , इंजिनियरींग नंतर पुढे एम . एस करण्यासाठी अमेरिकेला जायचं ठरवलं आणि त्याचवेळी आम्ही सुद्धा आयुष्यात कधीतरी अमेरिका वारी करणार हे जणू निश्चितच झालं . २०१९ च्या मे महिन्यात त्याचं convocation ( graduation ceremony ) होतं . अर्चितच्या कॉलेज तर्फे आम्हाला २०१८ च्या डिसेम्बर मध्ये अधिकृत आमंत्रण आलं आणि आम्ही आमच्या अमेरिका दौऱ्याच्या तयारीला लागलो . आम्ही म्हणजे मी , माझे मिस्टर सतीश आणि माझे सासरे .
सर्वात आधी Thomas cook मधून विमानाची तिकीट बुक केली गेली . नंतर नवीन कपड्यांची , चपला , बूट , स्वेटर यांची खरेदी , तिथल्या नातेवाईकांसाठी भेटवस्तू , अर्चितच्या नवीन घरासाठी काही गोष्टी , भांडी , विकतचे तसेच घरी बनवलेले त्याच्या आवडीचे पदार्थ , एक ना हजार गोष्टी .
घरात अक्षरशः मिनी लग्नकार्य असल्यासारखी गडबड सुरु होती . एकूण काय तर दौऱ्याच्या आधीच एक दोन महिने घर उत्साहाने भरून गेलं होतं . गेली दोन वर्ष अर्चित बरोबर दर दुसऱ्या दिवशी chating , video calls चालू असले तरी आता “ भेटी लागी जीवा लागलीसे आस ” असंच झालं होतं .
अमेरिकेला जायचं म्हणजे सर्वात आधी ताकीद मिळते ती मेडिकल इन्शुरन्स काढण्याची . कारण तिथे खाण-पिणं जितकं स्वस्त आणि मस्त तितकंच आजारी पडण त्रासदायक आहे . मग तिघांचे मेडिकल इन्शुरन्स , फ़ोरेक्ष कार्ड्स , international roaming अशा एक एक पायऱ्या सुद्धा पार केल्या .
म्हणता म्हणता जायचा दिवस उगवला , अहं मावळला आणि रात्र झाली .
आमची फ्लाइट मध्यरात्री दीड वाजताची होती आणि तीन तास आधी रिपोर्टिंग होतं . पण सतीशच्या punctual स्वभावा नुसार आम्ही वेळेच्या बऱ्याच आधी म्हणजे दहाच्याही आधी एयरपोर्ट वर पोचलो . सेक्युरिटी चेक इन साठी लाईनीत उभे राहिलो तेव्हा सांगण्यात आलं कि तुमचं चेक इन १० च्या आधी होणार नाही . मग काय एयरपोर्ट वरील इतर प्रवाशांचं निरीक्षण करत , थोडसं माझं फोटो सेशन करत वेळ काढला .
आमची फ्लाइट मध्यरात्री दीड वाजताची होती आणि तीन तास आधी रिपोर्टिंग होतं . पण सतीशच्या punctual स्वभावा नुसार आम्ही वेळेच्या बऱ्याच आधी म्हणजे दहाच्याही आधी एयरपोर्ट वर पोचलो . सेक्युरिटी चेक इन साठी लाईनीत उभे राहिलो तेव्हा सांगण्यात आलं कि तुमचं चेक इन १० च्या आधी होणार नाही . मग काय एयरपोर्ट वरील इतर प्रवाशांचं निरीक्षण करत , थोडसं माझं फोटो सेशन करत वेळ काढला .
सेक्युरिटी चेक इन सर्वात आधी आणि काहीही त्रास न होता पार पडलं आणि आमचं लगेज आत गेल्याने व हात मोकळे झाल्याने आम्ही आधी तिथल्याच एका lebanese stall वर एक नवीन प्रकारचा चिकन रोल खाल्ला . तसं आमच्याकडे इमर्जन्सी साठी म्हणून ठेपला , खाकरा , सफरचंद , dry fruits सगळंच होतं . पण बाहेर गेल्यावर बाहेरच खायची हौस जास्त . आणि मग पुढचे दोन तास एयरपोर्ट वरच्या सर्व दुकानांत रेंगाळत रेंगाळत फिरून घेतलं ( हे आम्ही दरवेळी करत असल्याने सगळी दुकान आता आमच्या ओळखीची झाली आहेत आणि कदाचित आणखीन एक दोनदा केलं तर आम्ही देखील त्या दुकानदारांच्या ओळखीचे होऊ ) .
फ्लाईट आली वेळेवर पण सुटली मात्र रात्री अडीच नंतर म्हणजे एक तास उशिरा . तोपर्यंत परत भूकही लागलेली आणि झोपही येत होती . पुढे आलेलं जेवण जड डोळ्यांनी पोटात ढकलून जवळ जवळ सगळेच प्रवासी निद्रेच्या अधीन झाले .
काहीवेळाने झोपेचा अंमल जरा कमी झाला . आमची फ्लाईट डायरेक्ट असल्याने कुठेही halt नव्हता . पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजेच परत एकदा भूतकाळात नेणारा सलग साडेपंधरा तासांचा अधांतरी प्रवास . खिडकीतून बाहेर पाहिलं तर मिट्ट काळोख . भारताच्या वेळेनुसार शनिवार पहाटेचे सहा वाजले होते तर US वेळेनुसार मात्र नुकतेच शुक्रवार रात्रीचे साडेआठ वाजत होते .
विमान आकाशात असल्याने ते ह्यावेळी नक्की कोणत्या देशावरून जात आहे आणि तिथे कोणती वेळ आहे हे कळायला मार्ग नव्हता . पण मनात आलं कि काल रात्री साधारण साडेआठ वाजताच तर आपण घरून निघालेलो आणि आता परत तीच भूतकाळातली वेळ मी चक्क परत अनुभवते आहे . हे झालं काही तास भूतकाळात मागे जाणं . पण १०० – २०० वर्ष किंवा त्याहीपेक्षा काळात मागे किंवा पुढे जाण्यासाठी time machine चा शोध लावणारे वैज्ञानिक अशाच पद्धतीचं काही logic किंवा principle वापरत असतील का ?
आता आजूबाजूला लक्ष गेलं . विमानातले इतरही काहीजण जागे झालेले दिसले . काहींच्या सीटवरचे दिवे लागले होते . कोणी लॅपटाॅप तर कोणी मोबईल मध्ये घुसलेले . कुणी पेपर , पुस्तक चाळत होते तर कुणी समोरची स्क्रीन चाळत होतं . काहीजण तासनतास बसून त्रास होतो म्हणून फेऱ्या मारत होते . फ्लाईट मधले अर्ध्यावर प्रवासी साठीच्या वरचे दिसत होते . ह्यावेळी अमेरिकेत climate अतिशय pleasant असतं म्हणून बहुतांश भारतीय आपल्या परदेशस्थ मुलांकडे जायला हाच सीजन निवडतात .
माझा वेळ सर्वांचं निरीक्षण करण्यात छान जात होता . मध्येच जाग येत होती मध्येच झोप लागत होती . म्हणता म्हणता पंधरा तास गेले आणि अचानक announcement झाली कि लवकरच विमान Newark airport वर land होणार आहे . घड्याळात पाहिलं तर ( बसल्या बसल्या घड्याळ अमेरिकन वेळेनुसार adjust केलेलं ) रात्री एक तास उशीरा सुटून सुद्धा पायलट ने विमान ठरल्या वेळेच्या १५/२० मिनिटं आधीच आणलं होतं .
गेले कित्येक तास विमानाच्या खिडकीतून फक्त मोठमोठाले कापसाचे पुंजकेच दिसत होते . पण आता विमान थोडं खाली उतरलं होतं . मधूनच किंचितशी हिरवाई डोकावत होती व क्षणार्धात नाहीशी होत होती . असं वाटत होत कि आता कोणत्याही क्षणी हा धुक्याचा दाट पडदा उघडणार आणि आपण एका अद्भूत जादुई नगरीत प्रवेश करणार . मन लगेच पैलतीरावर ( अमेरिकेच्या मातीत ) पोचलं सुद्धा . बाहेर पाहिलं तर एक अखंड सप्तरंगी इंद्रधनुष्य सोबत करत होतं .
लवकरच फ्लाईट लॅन्ड झाली आणि नील आर्मस्ट्रोन्ग ने ही चंद्रावर पाहिलं पाऊल ठेवलं नसेल त्या थाटात मी Newark airport वर पहिलं पाऊल ठेवलं .
© नयना पिकळे
( क्रमशः )
( क्रमशः )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा