शनिवार, १८ जानेवारी, २०२५

अयोध्यायात्रा आणि त्रिस्थळी - भाग १



तीर्थक्षेत्र किंवा धर्मस्थळं म्हणाल तर द्वारका, तिरूपति, महाकालेश्वर वगैरे सारखी काही मोजकी ठिकाणं सोडली तर आमची काही फारशी तीर्थयात्रा अजून तरी झाली नव्हती.
पण गेल्या वर्षी अमेरिकेत अर्चितकडे असताना अचानक आधी मेघाचा वाॅट्सअप वर मेसेज आला आणि मला मेसेज वाचताना online पाहून लगेच तिने फोनच केला.
त्यांचा एक गृप काशी, गया, प्रयाग अशी त्रिस्थळीयात्रा करायची ठरवत होते. त्या सोबतच जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येला रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने अयोध्या आणि चित्रकूट इथेही जायचं असा भरगच्च प्लान करत होते आणि मेघाने आम्हाला यायला आवडेल का असं विचारलं .
अर्थात तुम्ही कुठे कधी जायचं ठरवलं तर मलाही कळव असं मीच तिला सांगून ठेवल्याने आणि तिने सांगितलेल्या तारखा जुळत असल्याने मी आणि सतीशही ह्या सहलीत सामिल झालो.
तर एकूण आम्ही तेवीस जणं होतो . ह्या सहलीचं आयोजन आम्हा सर्वांच्या सोईनुसार आणि बजेटनुसार कल्याणचे "अखिलेश ट्रॅव्हल्स" ह्यांनी केलं आणि "अखिलेश ट्रॅव्हल्स" ची प्रज्ञा देशपांडे ह्या सहलीत अथ पासून इति पर्यंत आमच्या सोबतच होती.
पहिला दिवस
तर आमची सहल मंगळवारी सकाळी सुरू झाली. पहाटे साडेपाच वाजता उबर करून आम्ही विमानतळावर पोचलो. मुंबई ते वाराणसी फ्लाईट सात पन्नासची होती. आम्ही सवयीनुसार वेळेच्या बर्याच आधी पोचलेलो त्यामुळे मग तिथल्या लाऊन्ज मध्ये जाऊन मस्त ब्रेकफास्ट केला. तोवर गृपवर एकेकाचे विमानतळावर पोचल्याचे मेसेज सुरू झाले होते.
गृपवर सर्वांची नावं कळली असली तरी प्रत्यक्षात कोणाचीच ओळख नव्हती. एकमेव मेघा जिला मी ओळखत होते ती, तिचे मिस्टर आणि इतर दोघी ट्रेनने येणार होत्या.
आम्ही लाउन्ज मधून बाहेर आलो आणि आमच्या गेटवर येऊन शोधक नजरेने आमच्या वयाचं किंवा ओळखीच्या काही खूणा असलेलं कोणी दिसतं का ते पाहू लागलो.
तेवढ्यात तिघींच्या गृपमधल्या एकीने आम्हाला हेरलं आणि खुणावलं. त्यांच्याही चेहर्यावर प्रश्नचिन्ह होतंच . पण ह्याच त्या गृपमधल्या रोहिणीताई (निमकर) अशी ओळख पटली आणि अगदी दोन मिनिटातच अनेक वर्षांची ओळख असल्यागत आम्ही गप्पा मारू लागलो.
इतरही आठ दहा जणं भेटले. एकमेकांची ओळख होत होती. काहीजण बहुतेक गेटच्या दुसर्या बाजूला बसलेले . त्यांची ओळख मात्र थेट वाराणसी विमानतळावर उतरल्यावरच झाली.
तिथे सर्वात आधी सुप्रिया, सुनीता आणि स्मिताची ओळख झाली. कसं असतं कि एक दोनच नवीन ओळखी असल्या कि नावं लक्षात ठेवायला सोपं जातं. पण इथे सगळीच जणं नवीन होती.
म्हणून मग मी मनातल्या मनात ह्या तिघींची नावं पाठ करू लागले. म्हटल आधी ह्या तिघींची ओळख तरी पक्की होऊ देत. पण मी उगाचच काळजी करत होते. कारण पहिल्याच दिवशी सर्वांशी नव्याने ओळख झाली असली तरी सगळेच इतके मनमिळाऊ आणि गप्पीष्ट होते कि सर्वांचीच नाव सहज लक्षात राहिली.
तर अशाप्रकारे विमानतळावरच सर्वांची प्राथमिक ओळख झाल्यावर प्रज्ञाने अरेंज केलेल्या दोन मिनी बसेस मधून आम्ही हाॅटेलवर पोचलो. बसमध्येच आमची ओळख आमचा तिथला लोकल गाईड राहूल पांडे ह्याच्याशी झाली.
टुरिझमचा डिप्लोमा केलेला आणि इटालियन भाषा अवगत असलेला हा बिहारी गाईड अतिशय लाघवी आणि हुशार होता. सर्वांच्या कलाने घेऊन कोणालाही न दुखावता प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागण्याची कला त्याला अगदी सहजगत्या अवगत होती आणि ह्याचा प्रत्यय आम्हाला आमच्या पुढच्या सहलीत पदोपदी आला.
वाराणसीत आमचा दोन दिवस मुक्काम होता. तिथे हाॅटेलवर पोचल्यावर तिथल्या हसतमुख स्टाफने आम्हा सर्वांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून आणि मस्त चविष्ट सरबत देऊन आमचं अगदी राजेशाही स्वागत केलं.
अरे हो सांगायचंच राहिलं हाॅटेलवर येतानाच सर्वांना चहाची तल्लफ आल्याने राहूलनेच दाखवलेल्या वाटेवरच्या प्रसिद्ध 'शिवशंकर कचौडीवाले' कडे सर्वांनीच कुल्हडवाल्या चहासोबत छोले कचौडी आणि गरमागरम गुलाबजाम चापून खाल्ले होते.
आम्ही तर पहाटे विमानतळाच्या लाऊन्जवर भरपेट नाश्ताही केलेला होता त्यामुळे आम्हाला तरी जेवायची अजिबात इच्छा नव्हती. पण आमच्यातील काहीजणांनी प्रवासात खायला आणलेले ठेपले आणि पराठे खाल्ले.
ट्रेनने येणारी चार जणं ट्रेन लेट झाल्याने जरा उशीरा पोचली. तोवर लवकर पोचलेल्या आम्ही बाकीच्यांनी हाॅटेलच्या रूमवर जाऊन जरा आराम केला आणि फ्रेश झालो.
संध्याकाळी हाॅटेलच्या रिसेप्शनमध्ये फायनली ट्रेनने आलेली मेघा, तिचे मिस्टर आणि इतर दोघी भेटल्या. तिथून मग आम्ही गंगेच्या घाटावर महाआरती पाहायला गेलो. वाराणसीतले रस्ते बर्यापैकी अरूंद आणि त्यात ट्रॅफीक जबरदस्त . त्यामुळे पहिले दोन दिवस आम्ही दोन मिनी बसेस करून फिरलो. नंतर तिसर्या दिवसापासून सगळ्यांना मिळून एकच मोठी बस होती.
बस मधून वाराणसी शहर थोडफार अनुभवता आलं. आमचा गाईड राहूल दररोज सकाळी बस सुरू होताच सुरूवात करायचा - "श्रीगणेशजी की जय, काशी विश्वनाथ महाराज की जय, माता अन्नपूर्णा की जय, गंगामैय्या कि जय, श्री कालभैरव की जय, बटुक भैरव की जय,आणि ह्या सर्वाचा शेवट तो ॐ नमः पार्वती पते हर हर महादेव!" असे म्हणून करायचा.
ह्या विषयी त्याचे म्हणणे असे कि इतर सर्व ठिकाणी 'ॐ नमः शिवाय' किंवा 'हर हर महादेव' असा आपण गजर करतो . पण फक्त काशीतच "ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव" असं म्हणायची पद्धत आहे. ह्याचं कारण म्हणजे "बाबा बाबा सब कहे, मैय्या कहे न कोय, बाबा के दरबार में, मैय्या कहे सो होय" म्हणजेच शेवटी काय तर आपला स्त्रीशक्तिचाच विजय. भोळ्याभाबड्या महादेवाला प्रसन्न करायचे असेल तर आधी पार्वतीचे नाव घ्या, म्हणजे शंकर लवकर प्रसन्न होतो. त्यामुळे काशी विश्वेश्वराला प्रसन्न करायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे फक्त श्रद्धापुर्वक भक्तिने "ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव" म्हणायचं. बाकी कोणत्याच उपासाची किंवा कठोर व्रताची गरज नाही. मला तरी हे भारी आवडलं .
राहूलने सांगितलं कि 'वरुणा' आणि 'असी' ह्या दोन नदींच्या तटावर असल्याने हे 'वरुणासी', त्याचा अपभ्रंश होऊन वाराणसी आणि इंग्रजांना नाहीतरी कोणतेच उच्चार धड जमत नसल्याने वाराणसीचं कालांतराने बनारस झालं. तो सांगत होता कि वाराणसी जिला काशी सुद्धा म्हणतात ती पृथ्वीतलावर नसून शंकराच्या त्रिशूलाच्या टोकावर वसलेली आहे. तर ह्या आणि अशा इतर मनोरंजक गोष्टी ऐकत ऐकत आम्ही गंगामैय्या जवळ पोचलो.
गंगेवर एकूण ८४ घाट आहेत. आम्ही ज्या नमो घाटावर उतरलो तिथे खूपच सुरेख सजावट केली होती. आधी खिडकिया घाट नाव असलेल्या ह्या घाटाचा विकास पंतप्रधान मोदीजींनी पुढाकार घेऊन केला आहे. इथे एक पुरुष, एक स्त्री आणि एक लहान मूल ह्यांनी नमस्कारासाठी जोडलेल्या हातांची तीन अतिशय देखणी शिल्पे बनवलेली आहे.
इथूनच बोटीने गंगेतील इतर घाटांवरही जाता येतं. आम्ही तिथे थोडा फेरफटका मारून चहा प्यायलो. फोटो काढायला मस्त जागा असल्याने सर्वांनी मनसोक्त फोटोसेशन करून घेतलं. मग इथूनच दशाश्वमेध घाटावर जाण्यासाठी बोट केली. तिथेच दररोज संध्याकाळी गंगामैय्याची महाआरती होते.
आम्ही घाटाच्या पायर्यांवर बसून आरती पाहणार नव्हतो तर बोटीच्या वरच्या डेकवर बसून नदीतून येऊन समोरून आरती पाहाणार होतो.
बोटीतून जातानाचा अनुभव वर्णातीत होता. एकतर संध्याकाळची मंत्रमुग्ध करणारी वेळ, त्यातून डोळ्यांचं पारणं फिटावं असं ते विशाल गंगामैय्याचं दर्शन. बोटीतून जाताना जाणवणारा सुखद गारवा, पाण्याची झुळझुळ, पाण्यावर आभाळात दिसणारा पक्ष्यांचा थवा ….
आपण प्रत्यक्ष गंगामैय्याच्या अंगा खांद्यावर झुलत आहोत हा अनुभवच विलक्षण होता. मिनिटा मिनिटाला अंगावर रोमांच उभे राहात होते.
उजव्या बाजूला एकामागून एक घाट मागे टाकत आमची बोट पुढे जात होती. अस्सी घाट, सिंधिया घाट, भोसले घाट, मणिकर्णिका घाट असे करत करत आम्ही दशाश्वमेध घाटावर पोचलो.
मणिकर्णिका घाटावर सात आठ चिता जळतच होत्या. ते पाहून त्या स्थितीतही अंगावर शहारा आला. अधूनमधून काही घाटांवर आरती सुरू झालेली दिसत होती.
दशाश्वमेध घाटावर आमच्या आधीही काही बोटी येऊन थांबलेल्या. आमची बोट वाट काढत शक्य तितक्या पुढे जाऊन थांबली . समोर पाहिलं तर घाटाच्या पायर्यांवर तुफान गर्दी होती.
घाटावर सात ठिकाणी सुरेख सजावटीच्या छत्र्या बनवल्या होत्या आणि त्या खालचे चौथरे सुद्धा सजवले होते. पुजेची सर्व तयारी केली होती. तिथेच वेळेवर आरती सुरू झाली.
आरतीच्या आधी एका पंडितजींनी शंख वाजवला. तो शंखनाद बंदच होईना . एक मिनीट झाले, दोन मिनिटं झाली. ते पंडितजी पाच मिनीटांच्यावर अखंडपणे न थांबता शंख वाजवत होते. ते पाहूनच अंग क्षणाक्षणाला रोमांचित होत होतं.
आणि मग सुरु झाली गंगामैय्याची महाआरती. सात अन्य पंडितांनी एकत्र मिळून आरती केली. आम्ही सुद्धा वाटेत येताना विकत घेतलेले दिवे आणि फुलं ओवाळून आरती केली.
आम्ही व इतरही असंख्य लोकांनी मग आरती झाल्यावर ते दिवे गंगेत सोडले.
आजूबाजूला अंधार पसरला होता. गंगेच्या काळ्याशार पाण्यावर वाहात जाणार्या असंख्य दिव्यांच्या ज्योतींमुळे अगदी दूर पर्यंत पाण्यावर सुवर्णछटा पसरलेली होती.
जणू सुवर्णकाठाची चंद्रकळा ल्यायलेली गंगामैय्या तिच्या अंगाखांद्यावर खेळत असलेल्या आम्हा लेकरांना दर्शन द्यायला माऊलीरूपात साक्षात अवतरली होती. हे तिचं लेकुरवाळं रूप केवळ अनुभवातीत होतं.
कृतकृत्य होणं ही भावना खर्या अर्थाने त्यादिवशी अनुभवली. एका अत्यंत अदभूत दिव्य गोष्टीचे आपण आज साक्षीदार आहोत, आपल्या हातून आज काही तरी विलक्षण घडले आहे असं सतत जाणवत होतं.
भारावल्या अवस्थेतच परत नमो घाटावर आलो आणि तिथून बसने हाॅटेलवर परतलो. रात्र झालीच होती. मस्त जेवून त्या मंत्रावलेल्या स्थितीतच त्या रात्री सगळे झोपी गेलो.

© नयना पिकळे
(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताडोबा - जंगल सफारी

   ह्यावर्षीच्या जीवघेण्या उकाड्यात कुठे बाहेर जाणं तर सोडाच पण घरच्या घरीही गरमीचा त्रास सहन होत नाही. अशातच जर नागपूरला जायचा बेत ठरत असेल...