शनिवार, १८ जानेवारी, २०२५

स्टॅच्यू ऑफ यूनिटी आणि बरोडा - सहल

 अनेक दिवसांपासून 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'ला जायचा विचार होताच. त्यामुळे शाॅर्ट ट्रीप करायची असं ठरल्यावर सर्वात आधी हेच ठिकाण फायनल केलं. खरंतर 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' आणि आजूबाजूचा परिसर नीट निवांतपणे पाहायला दोन ते तीन दिवस व्यवस्थित पुरतात. पण आम्ही त्याचबरोबर दोन दिवस बरोड्याला सुद्धा जायचा बेत केला.

जायच्या दिवशी पहाटे सहा वाजता मुंबई सेंट्रलहून 'वंदे भारत' ट्रेन पकडून बरोब्बर दहा वाजता बरोड्याला उतरलो. तिथून हाॅटेलवर जाऊन फ्रेश होऊन फिरायला बाहेर पडायचं असं ठरलेलं.
पण आम्ही पोचलो तो दिवस होता नेमका १५जानेवारी म्हणजे संक्रात. गुजरात मध्ये संक्रांतीला घरोघरी पतंग उडवतात. तिथे हा सण फार हौसेने साजरा होतो. त्यामुळे त्यादिवशी बरोड्याची सर्व दुकानं आणि इतर सार्वजनिक ठिकाणं देखिल बंद होती. म्हणून मग कार्यक्रमात थोडा बदल केला आणि दुसर्या दिवशी जिथे जाणार होतो त्या चंपानेर येथील पावागढच्या काली मंदिरात पहिल्याच दिवशी जायचं ठरवलं.
सर्वांना बर्यापैकी भूका लागलेल्या म्हणून वाटेतच एका साध्या पण स्वच्छ हाॅटेलमध्ये गरमागरम मसाला खिचडी कढी, छास आणि गुलाबजाम अशा अस्सल गुजराती पदार्थांवर ताव मारला आणि खाऊगिरीचा श्रीगणेशा केला.
खरंतर ही खाऊगिरी सकाळीच वंदे भारत ट्रेनमध्ये ठेपला, बाकरवडी खाऊन सुरू झाली होती.
जेवल्यावर सर्वात आधी चंपानेर भागातील जामी मस्जिद पाहिली. ही मस्जिद सोळाव्या शतकात बांधली गेलेली असून आतील कोरीवकाम बरेचसे हिंदुपद्धतिचे आहे. भिंती व खांबांवर सूर्य, वेली, कमळं अशी चिन्हं खूप ठिकाणी दिसली. बांधकामाच्या शैलीत सुद्धा गुजराती मारवाडी पद्धत स्पष्टपणे जाणवत होती. संगमरवरी व लाल रंगांच्या दगडांनी बांधलेली ही मस्जिद खूपच सुरेख आहे.
चंपानेरच्या किल्ल्याभोवती भली मोठी भिंत आहे आणि आतमध्ये एक छोटेसे गावही आहे जे चावडा वंशातील एका राजाने बांधले होते. मुख्य म्हणजे इतक्या शतकांनतरही ते पडिक वगैरे नसून आजही त्या गावात अनेक लोक राहतात. त्या गावातून फिरणं हा वेगळाच अनुभव होता.
तिथून बाहेर पडताच शहरी मस्जीद नावाची आणखी एक मस्जिद पाहिली .
तिथून मग आम्ही सात कमान नावाची एक archeological site पाहायला गेलो. प्रत्यक्षात तरी तिथे एका मागे एक अशा सहाच कमानी दिसत होत्या आणि एक आडव्या कमानीच्या आकाराची अर्धवट अशी रचना दिसली. पण तिथे दुसरे कुणीही नसल्याने त्या स्थळाविषयी काहीच माहिती कळली नाही.
तिथून मग आम्ही गाडीने पावागढचा घाट चढायला सुरूवात केली. संक्रांतीची सुट्टी असल्याने रस्ता दोन्ही बाजूंनी माणसांनी गच्च भरला होता. मंदिर अजून बरेच लांब होते. पण तरीही लोकांचे लोंढेच्या लोंढे पायी चढून जाताना दिसत होते. पुढेपुढे तर गर्दी वाढतच गेली.
पावागढ मधील कालीमातेचे हे मंदिर एकावन्न शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. तिथे आधी रोपवे ने जावं लागतं आणि त्यानंतरही परत २५०-३०० पायर्या चढून जावं लागतं. आम्ही पाहिलं तर रोपवेची तिकिटं काढायलाच भली मोठी रांग लागलेली, त्यानंतर रोप वे मधून जाण्यासाठी दुसरी मोठी रांग . आम्ही पोचलेलो भर दुपारी अडीच तीन वाजता. इतकं लांब आशेने आलो होतो . पण समोरची गर्दी पाहून निराश झालो. दर्शन मिळेल कि नाही अशी शंका वाटली. दर्शन न घेताच परत मागे फिरणंही जीवावर आलं होतं. पण केवळ आमच्या ड्रायव्हरमुळे आम्हाला कोणत्याच रांगेत उभं राहावं लागलं नाही. तिकिटंही मिळाली आणि दर्शनही अतिशय सुरेख झालं. बरं आणि हे सगळं कुठेही एक जास्तीचा पैसा खर्च न करता. बहुतेक देवीच्याच मनात होतं आम्हाला दर्शन द्यायचं म्हणून ड्रायव्हरच्या रूपात आम्हाला मदत मिळाली.
आवारात मंदिराच्या बरोबर समोर एक भला मोठा वाघाचा पुतळा आहे आणि उजव्या बाजूला काळभैरवाचे मंदिर आहे. मुख्य मंदिर दक्षिणमुखी आहे असं कळलं. इथे काही वेळ काढून उंचावरून आजूबाजूचा परिसर डोळे भरून पाहिला आणि मग परत निघालो.
हाॅटेलवर पोहोचेपर्यंत सात वाजले. रात्रीचं जेवण हाॅटेलमध्येच होतं. इथे एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते कि गुजराती जेवण गोडसर असतंच पण त्यापेक्षा इथली लोक जास्त गोड स्वभावाची असतात. त्यांचं वागणं, बोलणं सगळंच खूप लाघवी . आमचा ड्रायव्हर, हाॅटेलमधला स्टाफ, फिरताना भेटलेले इतरही सगळे स्थानिक लोक अतिशय आपलेपणाने बोलत होते, मदत करत होते आणि मुख्य म्हणजे योग्य मार्गदर्शन करत होते .
तर सांगायचा मुद्दा हा कि जेवणाच्या वेळी बुफे असूनही तिथल्या स्टाफने अतिशय अगत्याने आम्हाला काय हवं नको ते जातीने पाहिलं, तिथल्या मुख्य शेफने तर कमालच केली. बुफेमध्ये कितीतरी प्रकारची डेझर्टस होती. आम्ही सर्वांनी आवडीप्रमाणे त्यातली दोन तीन खाल्ली. पण बहुतेक तिथे ठेवलेली काजूकतली आम्ही गेलो तेव्हा संपली होती. अर्थात हे आम्हाला माहितच नव्हतं. पण मुख्य शेफला आमच्याशी बोलताना हे कळलं आणि केवळ आम्हाला ती चाखता आली नाही म्हणून दुसर्या दिवशी रात्री त्याने केवळ आमच्यासाठी ती परत बनवली आणि आग्रहाने आम्हाला खाऊ घातली. हे असे अनुभव खरोखरंच दुर्मिळ असल्याने माझ्या तरी हे कायम लक्षात राहील.
दुसर्या दिवशी सकाळी नाश्ता करून सर्वात आधी आम्ही लक्ष्मीविलास पॅलेस आणि म्युझियम पाहायला गेलो. हा पॅलेस सुप्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसच्या चौपट आहे म्हणे. १७० खोल्या असलेला जगातला हा सर्वात मोठा खाजगी राजवाडा म्हणून प्रसिद्ध आहे. हा आलिशान पॅलेस तिसरे सयाजीराव गायकवाड ह्यांनी बांधला. राजवाड्याच्या परिसरात जागोजागी सुरेख कारंजी आणि देखणे पुतळे आहेत. राजवाड्यातील दालनांमध्ये पौराणिक कथांवर आधारित अनेक तैलचित्रे आणि ईटालियन शिल्पकलेचे अप्रतिम नमुने पाहायला मिळाले. पॅलेसमध्ये जातानाच प्रत्येकाला इयरफोन्स दिले जातात ज्यामुळे प्रत्येक दालनाबद्दल अगदी सविस्तर रेकाॅर्डेड माहिती आपल्याला हव्या त्या भाषेतून ऐकता येते .
राजवाड्याच्या पहिल्या मजल्यावर आजही सध्याचे राजे समरजीतसिंह गायकवाड आपल्या आई, पत्नी व दोन मुलीं सोबत राहतात.
ह्या पॅलेसच्या परिसरातच महाराजा फतेहसिंह संग्रहालय आहे. इथे राजा रवि वर्माच्या तैलचित्रांचे एक अख्खे मोठे दालन आहे. इतर सुप्रसिद्ध कलाकारांची चित्रेही आहेत, हस्तिदंताच्या अतिशय दुर्मिळ वस्तू, चीनी आणि जपानी घडणावळीच्या वस्तू, फुलदाण्या वगैरे हरतर्हेच्या गोष्टी आकर्षक रित्या मांडून ठेवलेल्या आहेत. संग्रहालयाच्या बाहेर छोटीशी खेळण्यातली पण खरीखूरी चालणारी एक झुकझुक गाडी ठेवली आहे. ही गाडी त्या काळच्या महाराजांना त्यांच्या वडीलांनी पाचव्या वाढदीवसानिमित्त भेट म्हणून दिलेली.
तिथून मग आम्ही कामाटी बागेत गेलो. इथे परत म्युझियम, प्लॅनेटेरियम, प्राणीसंग्रहालय सारख्या काही गोष्टी होत्या . पण नुकतंच पॅलेस आणि म्युझियम बघितल्याने आम्हाला त्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. म्हणून मग आम्ही तिथल्या टाॅय ट्रेनमध्ये बसून संपूर्ण बागेचा मस्त फेरफटका मारला आणि तिथून सटकलो.
नंतर आम्ही EME मंदीरात गेलो. संपूर्ण एल्यूमिनियमचं बनलेलं हे दक्षिणमुखी शंकराचं मंदिर अतिशय अनोखं आणि माझ्या माहितीप्रमाणे तरी ह्या प्रकारचं एकमेव असं आहे . भारतीय सेनेच्या इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल आणि इंजिनियरींग गृपने बनवलेले म्हणून ह्याचे नाव EME मंदीर.
मुख्य मंदिरातलं वातावरण अतिशय शांत आणि थंड होतं. तिथून उठावसंच वाटत नव्हतं. मंदिराच्या परिसरात पाचव्या सहाव्या शतकातील देवदेवतांच्या अनेक प्राचीन मूर्त्या आणि नवग्रहांचे मंदिर आहे. तिथे अनेक वडांची झाडे आहेत ज्यांना ऋषीमुनींची आणि नक्षत्रांची नावे दिलेली आहेत. गौतम बुद्धाची अतिशय सुरेख ध्यानमग्न मूर्ती इथे आहे. भारतीय सैन्याच्या इतर मंदिरांप्रमाणेच इथेही इतर सर्वच धर्माच्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत .
हे सर्व पाहून होईपर्यंत संध्याकाळ होऊन गेली होती. काळोख पडला होता. तरी उत्साह असल्याने खरेदीसाठी बरोड्याच्या अलकापुरी आणि मंगल मार्केट मध्ये फिरलो. पण मनासारखे काही मिळाले नाही.
शेवटी काहीच न घेता तिथल्या 'जगदिश' नावाच्या प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात शिरलो. तिथे मात्र मिठाई फरसाण वगैरेची सर्वांनी मनसोक्त खरेदी केली. रात्री हाॅटेलवर येऊन फ्रेश होऊन जेवायला गेलो.
तिसर्या दिवशी सकाळी हाॅटेलवरून चेक आऊट करून केवडियाला निघालो. केवडिया हे खरंतर छोटसं गाव . पण इथे 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' झाल्यावर ह्या गावाला प्रसिद्धी मिळाली आणि आता इथे एकतानगर स्टेशन सुद्धा झालं आहे . भारतातील अनेक ठिकाणहून इथे ट्रेनने येणं आता सोपं झालंय.
'स्टॅच्यु ऑफ युनिटी'ला भेट देण्यासाठी दुपारचा चारचा स्लाॅट आम्ही बूक केला होता. त्यामुळे वाटेवरच एका ढाब्यावर जेवलो आणि दोनच्या सुमाराला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' परिसरात पोचलो.
परिसर सुरू व्हायच्या आधी बाहेरच चौकात मगरीवर आरूढ असलेल्या नर्मदानदीचा अतिशय सुरेख पुतळा आहे . आतमध्ये सगळीकडे फिरण्यासाठी मोफत ए.सी बसेस आहेत. परीसरात हिंडून पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत.
चार वाजायला बराच वेळ असल्याने आम्ही आधी सरदार सरोवर डॅम वर गेलो. नंतर फ्लाॅवर व्हॅली पाहिली. बाजूलाच ग्लो गार्डन होतं. रात्री काळोख झाल्यावर तर्हतर्हेच्या दिव्यांनी हे गार्डन पूर्णपणे उजळून निघतं. पण आम्ही ते दुपारीच पाहिलं. परत वेळ मिळाल्यास रात्री येऊ असं ठरवलं, पण नाही जमलं.
त्यानंतर पावणेचारला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पाहायला गेलो. भारताचे आयर्न मॅन म्हणून ओळखल्या जाणार्या भारताच्या पहिल्या उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेलांचा हा पुतळा. १८२ मीटर उंचीचा अतिशय भव्य नेत्रदीपक असा हा स्टील आणि लोखंडाचा वापर करून बनवलेला आज जगातील सर्वात मोठा पुतळा आहे.
ह्या पुतळ्याच्या आतही सरदार पटेलांचा एक सुरेख पुतळा आहे. तिथे स्वातंत्र्य संग्रामाबद्दलची माहिती देणारी चित्रे लावलेली आहेत. छोटेसे संग्रहालय बनवलेले आहे . तिथल्या लिफ्टमधून आम्ही ४५व्या मजल्यावर म्हणजे १५३ मीटर उंचीवर गेलो जिथे सरदार पटेलांच्या छातीपर्यंत जाता येतं. तिथून खालचे सरदार सरोवर आणि आजूबाजूचा डोंगरांनी वेढलेला संपूर्ण देखणा परिसर पाहता येतो.
तिथला सर्व परिसर फिरून, मनसोक्त फोटोसेशन करून आम्ही पुतळ्या समोरच्या बाकांवर जागा अडवून बसलो. कारण साडेसहाला तिथे साऊंड अँड लेझर शो सुरू होणार होता.
लेझर व गाण्यांच्या माध्यमातून सरदार पटेलांचे स्वातंत्र्य संग्रामातील स्थान आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व ह्याविषयीची माहिती खूपच प्रभावीरित्या सांगितली आहे.
लेझर शो बरोबर साडेसातला संपला आणि लगेच तिथूनच एक बस पकडून आम्ही नर्मदा नदीच्या घाटावरील महाआरती पाहायला गेलो . तिथली महाआरती पाहाणं हा एक वेगळाच अनुभव होता.
नर्मदेच्या पाण्यावर सुंदर लेझर शोच्या माध्यमातून नर्मदेची आरती, शिवतांडव स्तोत्र व इतर काही आरत्या झाल्या. आरतीला कुठेही धक्काबुक्की नव्हती. सर्वांनाच बसायला भरपूर जागा होती . परिसर अतिशय स्वच्छ होता. जवळ जवळ पाच सहा पुजारी घाटावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून आरती करत होते . पण त्या सर्वांचं co-ordination खरच कौतुकास्पद होतं.
नर्मदेची आरती झाल्यावर लगेचच दुसर्या बसने आम्हाला तिथून परिसराच्या बाहेर आणून सोडलं आणि तिथून मग आम्ही आमच्या कारमधून हाॅटेलवर परतलो.
चौथ्या दिवशी सकाळी परत 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ला जाऊन तिथली इतर राहिलेली ठिकाणं पाहिली. सर्वात आधी तिथली फुलांचीबाग, कॅक्टस गार्डन आणि एकता नर्सरी पाहिली.
बागेत अनेक प्रकारचे वृक्ष, फुलझाडे, नीट कटींग करून आकर्षक रचना केलेली झुडुपं होती. असंख्य प्रकारचे आणि रंगाचे कॅक्टस पाहिले . एकता नर्सरीत अनेक प्रकारची झाडं होती, बाॅन्साय झाडांचा एक विभाग होता, ऑर्किड गार्डन होतं, नर्सरीतल्याच वस्तू वापरून बनवलेल्या वस्तूंचे दुकान होते . तिथे स्थानिक बायकांनी बनवलेल्या मातीच्या आणि लाकडाच्या अनेक वस्तू, मसाले, अगरबत्ती, अनेक प्रकारचे मध, औषधं वगैरे होती. तिथे थोडी खरेदी केली आणि जेवणाची वेळ झालीच होती म्हणून तिथेच अतिशय चविष्ट थाळी खाल्ली .
त्यानंतर बटरफ्लाय गार्डन मध्ये गेलो. इथे तर भर दुपारी जाऊनही फुलपाखरांचे थवेच्या थवे पाहायला मिळाले. आणि तरी तिथली माहिती देणारी बाई सांगत होती कि आता दुपारची वेळ असल्याने फुलपाखरं जरा कमी आहेत.
तिथून आरोग्यवनात गेलो. हे उद्यान म्हणजे मात्र खरोखरच अतिशय अभिनव संकल्पना आहे . एका मोठ्या जागेत मानवाची आकृती बनवली आहे. ह्या मानवाच्या ह्रदयाच्या ठिकाणी ह्रदयाच्या संबंधीत औषधी, पोटाच्या ठिकाणी अजीर्ण, लिव्हर, किडनीरोगांवर उपचारासाठी वापरल्या जाणार्या वनस्पती, डोक्याच्या ठिकाणी मेंदू आणि स्मरणशक्ति संबंधीत वनस्पती ह्यांची लागवड केली होती. मला हे उद्यान आणि ही कल्पना दोन्ही प्रचंड आवडले.
तिथून मग जंगलसफारी आणि बर्डपार्कमध्ये गेलो.
जंगलसफारीत इतर अनेक जनावरांबरोबर पांढरा वाघ, पांढरा सिंह आणि ब्लॅक पॅन्थर पाहिला. ऑस्ट्रेलियामधले Ilamas, Onyx , Alpacas नावाचे अजिबातच माहित नसलेले प्राणी प्रथमच पाहिले.
पांढर्या वाघाने तर कमालच केली. आम्हा सर्वांसमोरून एक मोठी फेरी मारली, मग वर मचाणावर चढून तिथे मस्त रॅम्पवाॅक केला आणि तोर्यात बाजूला बसला.
बर्डपार्कमध्ये सुद्धा धमाल केली. जाळी लावलेल्या एका भल्या मोठ्या जागेत सर्व पक्षी होते आणि आम्ही तिथे आत गेलो. काकाकुआ, मकाव, मोर, बगळे, फ्लॅमींगो आणि इतर असंख्य पक्षी अगदी आमच्या अंगा खांद्यावरून, अगदी बाजूने चिकटून जात होते, उडत होते, खात होते. फार मजा आली .
संध्याकाळ झाली होती आणि हाॅटेलवर परतायचं होतं. आज खरंतर आमचा ड्रायव्हर काही कारणामुळे नव्हता . पण मोफत बससेवा एकतानगर स्टेशन पर्यंत होती आणि आमचं हाॅटेल स्टेशनच्या अगदी समोर होतं त्यामुळे कसलाही त्रास न होता आम्ही हाॅटेलवर पोचलो.
आज आमचा इथला पाचवा आणि शेवटचा दिवस होता. सकाळी हाॅटेलमधून चेक आऊट करून केवडीयाहून दुपारी बरोड्याला पोहोचायचं होतं . पण त्याआधी आणखी दोन ठिकाणं पाहायची होती.
पहिलं होतं गरुडेश्वर महादेव मंदिर. हे आमच्या हाॅटेलवरून तासाच्या अंतरावर होतं. हे मंदिर सुमारे दोन हजार वर्ष जुनं असून ते शंकराने गरूडाच्या रूपात येऊन बांधले अशी मान्यता आहे.
हे देऊळ पाहिल्यावर काश्मीरला शंकराचार्यांचा मठ पाहिलेला त्याची आठवण झाली . अगदी तसंच साधं, छोटं आणि अतिशय पवित्र शांत असं हे देऊळ आहे.
बाजूलाच एक दत्तमंदिर आहे. तिथे दत्ताची, शंकराचार्यांची आणि सरस्वती देवीची मूर्ती आहे. हे नर्मदा परिक्रमेतील एक ठिकाणं आहे. परिक्रमा करणारे काही साधक इथे थांबून विश्रांती घेत होते.
तिथून निघालो आणि आणखी तासभर पुढे जाऊन पोयचा ह्या ठिकाणचे नीलकंठधाम येथील स्वामीनारायण मंदिर पाहिले.
ह्या मंदिराचे कोरीवकाम अतिशय सुरेख आहे . मुख्य मंदीरातील स्वामीनारायणांची मुर्ती अतिशय सुरेख आहे. तिथल्या कृष्णाच्या मंदिरात बाळकृष्णाचा पाळणा ओढताना एक वेगळीच अनुभूति मिळते. चारही वेंदांची आणि सप्तऋषींची मंदिरेही आहेत. मुख्य मंदिराच्या भोवती विष्णूच्या चोवीस अवतार स्वरूपातली चोवीस छोटी शाळीग्राम मंदिरे आहेत.
मंदिराच्या परिसरात ठिकठिकाणी मूर्ती व पुतळ्यांच्या माध्यमातून कृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंग साकारले आहेत, रासलीलेचा प्रसंग तर केवळ अप्रतिम. हे मंदीर आणि हा संपूर्ण परिसरच डोळ्यांचं पारणं फेडणारा असा देखणा आहे.
तिथून मग शेवटी आम्ही बरोड्याला आलो. ट्रेनमध्ये बसायच्या आधी तिथल्याच 'सासूमाँ' नावाच्या हाॅटेलमध्ये मस्त गुजराती थाळी घेतली. इथल्या मालपोआची चव अजूनही जीभेवर रेंगाळते आहे.
तिथून बरोडा स्टेशवर पोचलो. आमची 'वंदे भारत' गाडी वेळेवर आली. बरोडा ते मुंबई अवघा चार तासांचा प्रवास पण ह्या चार तासात जीभेचे इतके चोचले पुरवले गेले कि काही विचारू नका. आधी गरमागरम मसालाचहा, सोबत कचोरी बाकरवडी वगैरे होतंच. मग थोड्याच वेळात चक्क जेवण आलं . त्यात व्हेज लोकांसाठी डाळ जीराराईस, पनीर मसाला आणि रोटी होती तर नाॅनव्हेज मध्ये पनीर ऐवजी चिकन होते. जेवणानंतर हॅवमोरचं आईस्क्रीमही होतं. आमचा हा ट्रेन प्रवास खातखातच झाला म्हणायला हरकत नाही.
वंदे भारत ट्रेन मधली व्यवस्था खरच खूपच छान आहे. आरामदायी सीट्स, भरपूर लेगस्पेस, स्वच्छ शौचालय, प्रवास तीन तासांचा असो कि दहा तासांचा खायला प्यायला भरपूर.
आता भारतात जिथे जायचं असेल तिथे जर वंदे भारत ट्रेन सुरू झाली असेल तर सर्वात पहिलं प्राधान्य वंदे भारतलाच असं ठरवून टाकलंय.
आणि हो Last but not the least आमची ही सहल सुद्धा 'गौरी टूर्स' नेच आम्हाला हवी तशी, आमच्या बजेटप्रमाणे आयोजित करून दिली होती. त्यामुळे आमच्या ह्या सहलीचं संपूर्ण श्रेय गौरीला जातं . Thanks Gauri for such a lovely arrangement .
© नयना पिकळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताडोबा - जंगल सफारी

   ह्यावर्षीच्या जीवघेण्या उकाड्यात कुठे बाहेर जाणं तर सोडाच पण घरच्या घरीही गरमीचा त्रास सहन होत नाही. अशातच जर नागपूरला जायचा बेत ठरत असेल...