सोमवार, ६ जानेवारी, २०२५

आमची कूर्ग सहल - भाग २

 कूर्गहून निघाल्यावर आमचा आता म्हैसुरूला दोन दिवस मुक्काम होता.

त्या आधी आनंदने आम्हाला आणखी एका स्थानिक व्यक्तिच्या घरी नेलं. त्यांनी आपल्या घराभोवतीच्या बागेत अनेक फुलझाडं लावून तिथे मधमाशांसाठी लाकडी खोकी बांधली होती. तिथे आम्हाला शुद्ध घरगुती मधही मिळाला आणि त्यांच्या उत्साही तरूण मुलाने मधमाशा मध कसा गोळा करतात, त्या मधाचे पोळे कसे बनवतात हे सगळं ती लाकडी खोकी उघडून, आतून ती कशी दिसतात ते दाखवून समजावून सांगितलं.
तिथून मग पुढे म्हैसुरूला जायला नागरहोळे राष्ट्रीय उद्यानातून जाणारा मार्ग निवडला. हा प्रवास साधारण दोन अडीच तासांचा आहे. कारण ह्या मार्गावरून तुम्हाला धीम्या गतीने, कोणताही आवाज न करता, मध्ये कुठेही गाडी न थांबवता जावे लागते. पण हा प्रवास शक्यतो अजिबात चुकवू नये असा आहे.
आम्हाला प्रवासभर अनेक प्रकारचे पक्षी तर दिसलेच, पण झाडांवरून उड्या मारणारी माकडं, मोकळेपणाने बागडणारी कितीतरी हरिणे व सांबर, हत्तींचे अगदी जवळ उभे असलेले कळप आणि रानगवा देखील दिसला. पिंजर्यातले केविलवाणे वाघ सिंह बघण्यापेक्षा असे मुक्त मोकळे असलेले हत्ती आणि हरिणं पाहायला मला जास्त आवडतं.
तर हा अतिशय देखणा प्रवास फायनली संपला आणि आम्ही दुपारी म्हैसुरूला पोचलो .
तिथे ज्या हाॅटेलमध्ये आम्ही दोन रात्र राहाणार होतो त्याच्या नावात Orchid असल्याने ते विठ्ठल किमत ह्याचं असेल आणि तिथली सोय खूप छान असेल असं वाटलेलं. पण एक तर ती केवळ Franchise असावी किंवा योगायोगाने फक्त नावात Orchid होतं.
तिथले Chef आणि इतर कर्मचारी अतिशय अगत्यशील, नम्र आणि हसतमुख असले तरी हाॅटेलची सर्विस मात्र अगदीच यथातथा होती. एक गोष्ट परतपरत सांगावी लागत होती. गौरी सुद्धा रोज आठवणीने फोनवरून आमच्या प्रवासाची चौकशी करत असे. तिलाही आम्ही परिस्थितीबद्दल कल्पना दिली.
शिवाय आम्ही तिथल्या मॅनेजरकडे ह्याबाबत तक्रार केली. गौरीने सुद्धा आमचा असा फीडबॅक मिळताच कदाचित हाॅटेलच्या मॅनेजमेंटला तसं सांगितलं असावं कारण दुसर्या दिवशी त्यांच्या सर्विसमध्ये बराच फरक पडलेला जाणवला. पण तरी तिथे सगळ्याच बाबतीत एक प्रकारचा सुस्तपणा होता.
त्या दिवशी संध्याकाळी इतर काही करण्यासारखं नसल्याने आम्ही हाॅटेलच्या समोरच्या रस्त्यावर फेरफटका मारला आणि पावसाची झड आली तशी मस्त भिजतभिजत हाॅटेलवर परतलो.
म्हैसुरू शहर अतिशय स्वच्छ आहे आणि शहराला लागोपाठ तीन वर्षे स्वच्छ शहराचं बक्षिसही मिळालेलं आहे असं कळलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान प्रशस्त इमारती, बंगले, टुमदार घरं आणि अवतिभवति हिरवीगार झाडं ह्यामुळे रस्त्यांवरून फिरताना मस्त वाटायचं. तिथे उकाडा मात्र प्रचंड. कूर्गला जितकं थंड, प्रसन्न त्याच्या उलट इथे मरणाची गरमी.
दुसर्या दिवशी म्हणजे शनिवारी आम्ही सर्वात आधी चामुंडा हिल्स वर जायचं ठरवलं कारण नंतर उन्हंही वाढतं आणि गर्दीही वाढण्याची शक्यता होती. पण आम्ही जेव्हा डोंगरावर पोचलो तेव्हा आधीच इतकी प्रचंड गर्दी आणि धक्काबुक्की होती की पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही हे लक्षात आलं. शिवाय ८-१० वर्षांपुर्वी आम्ही बेंगळुरू, म्हैसुरू, ऊटी, कोडाईकनाल ह्या सहलीत चामुंडा देवीचं दर्शन घेतलं होतं त्यामुळे खूप काही गमावलंय अशी हळहळ न करता शहाणपणाने तिथून परतायचा निर्णय घेतला.
तिथून मग आम्ही चमराजेंद्र झुओलाॅजीकल पार्क मध्ये गेलो. हे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात जुने पशुउद्यान मानले जाते. सुमारे पाच किलोमिटर क्षेत्र असलेलं हे उद्यान. कितीतरी पक्षी, प्राणी, जलचर आणि सरपटणार्या प्राण्यांच्या असंख्य जाती इथे आहेत. आम्ही तिथे भरदुपारी पोचलो होतो आणि ती वेळ प्राण्यांची खायची असल्याने आम्हाला प्राण्यांना खाताना-भरवताना पाहायला मिळालं.
तिथल्या प्राण्यांची नावंही मोहिनी, अभिमन्यु, ऊर्वशी असी वाचायला मजा येत होती. शिवाय तिथे प्राण्यांना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करण्याचा अभिनव उपक्रमही म्हैसुरू सरकारने सुरू केला असल्याने प्रत्येक प्राण्यासमोर त्याला दत्तक घेतलेल्याचं नाव आणि माहितीही लिहिली होती.
ते झू अतिशय अफाट आहे आणि तिथे आतमध्ये फिरायला छोटी गाडीही भाड्याने मिळत होती. पण आम्ही पायीच फिरायचं ठरवल्याने आम्हाला जवळजवळ अडीच तीन तास लागले.
त्या झूचं मुख्य आकर्षण म्हणजे जिराफ. भारतातील अगदी मोजक्या पशु उद्यानात जिराफ आहेत. चमराजेंद्र उद्यान हे भारतातील सर्वात जास्त जिराफ असलेलं उद्यान आहे. अतिशय रुबाबदार देखणे आणि उमदे जिराफ इथे पाहायला मिळाले.
नंतर आम्ही कावेरी नदीवर बांधलेलं कृष्णराजसागर धरण पाहिलं .
तिथून आम्ही धरणाच्या बॅकवाटर्स वर असलेलं वेणूगोपाळ मंदिर पाहायला गेलो. हे मंदिर चारही बाजूंनी कावेरी नदीने वेढलेलं आहे. होयसाळा पद्धतीचं वास्तुशास्त्र असलेलं बाराव्या शतकातलं हे मंदिर. पण धरण बांधायच्या वेळी हे मंदिर पाण्याच्या आत पूर्णपणे बुडले जाणार होते. तेव्हा मूळ मंदिराच्या जवळच दुसरे आधीसारखेच नविन मंदिर बांधून आतील वेणूगोपाळच्या मुख्य मूर्तीची तिथे पुनर्स्थापना करण्यात आली.
मंदिरात मुख्य गाभार्यात वेणूगोपाळ म्हणजे कृष्णाची अतिशय सुरेख मूर्ती आहे. गाभार्या भोवती अनेक लहान मंदिरे आहेत ज्यात भारतातील सर्व मुख्य नद्या, विष्णूचे दशावतार, नवग्रह आणि मुख्य ऋषिंची छोटी मंदिरं बांधली आहेत. इथलं वातावरण खूपच प्रसन्न, नदीतीरावर असल्याने हवेशीर आणि पावित्र्याने भरलेलं होतं.
इथली एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे इथल्या मंदिराच्या परिसरात असलेलं सुलभ शौचालय. आता तुम्ही म्हणाल विषय काय चाललाय आणि कुठे नेताय. पण एकतर कूर्ग असो कि म्हैसुरू कि बेंगळुरू, अगदी रस्त्याच्या कडेवर असलेली शौचालयंही खूप साफ स्वच्छ होती. इथेही आम्ही आत जाऊन आल्यावर तिथे कामाला असणार्या एका बाईला पैसे देऊ केले. आश्चर्य म्हणजे तिने ते थॅन्क्यु म्हणून स्पष्टपणे नाकारले. इतर ठिकाणी अतिशय गलिच्छ ठेवलेल्या शौचालयातही हक्काने पैसे मागणार्यांना आवर्जून सांगावसंच हे उदाहरण आहे.
इथून आम्ही विश्वप्रसिद्ध वृंदावन गार्डनला जायला निघालो. पण गेल्या दोन तीन दिवसात काही जणांच्या बोलण्यावरून आमची इथे निराशा होणार असं वाटत होतं. आणि तेच झालं. उद्यानाची स्थिती पाहावत नव्हती.
सगळीकडे कचरा आणि घाणीचे ढीग पडले होते. कारंजे तर चालतंच नव्हते. फुलझाडांची देखील नीट नीगा ठेवली नव्हती. तिथला "Light & Sound show" तर सर्वात प्रसिद्ध. पण तो शो देखील बंद करण्यात आला होता. कारंज्यांचे पाईप अक्षरशः गंजलेले होते आणि त्यातच लोकांनी खाऊन फेकलेली रिकामी पाकिटे, पाण्याच्या बाटल्या सर्व पडलेले होते.
पुर्वी ह्या देखण्या उद्यानाचं सौंदर्य पाहिलेलं, अनुभवलेलं असल्याने आज त्या उद्यानाची झालेली ही दयनीय अवस्था पाहून अंगावर काटा आला. म्हैसुरू सरकारने आपले संपूर्ण शहर अतिशय सुंदर आणि दृष्ट लागावे इतके स्वच्छ ठेवले आहे. मग भारताचा सांस्कृतिक वारसा असलेल्या ह्या जगप्रसिद्ध उद्यानालाच अशी सावत्र वागणूक का? इथे इतकं दुर्लक्ष का ते कळलं नाही. एक दोन वर्ष हे उद्यान लोकांसाठी पूर्ण बंद ठेवून त्याचं नूतनीकरण करणं नितांत गरजेचं आहे. तिथून हळहळतच बाहेर पडलो.
अजून रात्र व्हायला तसा अवकाश होता आणि आमची प्रसिद्ध म्हैसुर सिल्क साडीची खरेदीही राहिली होती. मग आनंदच आम्हाला एका चांगल्या दुकानात घेऊन गेला. गौरीने आम्हाला तिथून म्हैसुर क्रेप सिल्क खरेदी करा असं आठवणीने सांगितलेलं. पण तशी साडी काही मनात भरेना. म्हणून तिथे मी आणि माझ्या जावेने म्हैसुर बनाना सिल्क साड्यांची खरेदी केली. हा देखिल साडीचा एक नवीन आणि अतिशय छान प्रकार आहे. पण म्हैसुर क्रेप सिल्क काही मनातून गेली नव्हती.
तरीही मनाजोगी खरेदी करून आम्ही हाॅटेलवर परतलो. दुसर्या दिवशी सकाळी हाॅटलमधून चेक आऊट करून तिथून जवळच असलेलं "रेल्वे म्युझियम" पाहिलं. अतिशय नाविन्यपूर्ण अशा ह्या म्यूझियममध्ये जुन्या काळातली आगगाडीची वेगवेगळ्या प्रकारची इंजिनं, डबे वगैरेच्या प्रतिकृती बनवून ठेवलेल्या आहेत. तसेच भारतीय रेल्वेच्या प्रगतीचा इतिहास सांगणारी चित्रे व फोटो आहेत. त्या काळची तिकिटं, रेल्वे सिगन्ल्स, जुने विविध प्रकारचे लाईट अशा बर्याच गोष्टी माहितीसकट ठेवलेल्या आहेत. पर्यटकांसाठी बॅटरीवर चालणारी एक छोटी आगगाडी सुद्धा आहे. त्यातून सर्वांना राऊंड मारून आणत होते. आम्हीही परत एकदा लहान होऊन त्या झुकझुक गाडीतून फिरून आलो.
तिथून मग आम्ही म्हैसुरू महाराजांचा पॅलेस पाहायला गेलो. पण आम्ही गेलो तो दिवस रविवार असल्याने इथेही प्रचंड गर्दी आणि धक्काबुक्की होती. तरी त्या गर्दीतून आत जाऊन पॅलेस फिरून आलोच.
वडियार राजाने बांधलेल्या ह्या पॅलेसच्या बाहेर अतिशय सुरेख असे गुलाबसर रंगाचे घुमट आहेत. पॅलेसच्या भोवतालची बागही खूप छान ठेवली आहे आणि पॅलेसच्या आतली भव्य दालने, अप्रतिम नक्षीकाम असलेले मोठमोठे स्तंभ, चित्रकार राजा रवि वर्माच्या सुरेख चित्रांनी सुशोभित भिंती. संपूर्ण पॅलेस इतका सुरेख आहे कि कितीदाही पाहिला तरी मन भरत नाही. पण गर्दीतून जितकं शक्य झालं तितकाच डोळे भरून पॅलेस पाहिला आणि ह्यापुर्वीही हा पॅलेस मनसोक्त पाहायचं भाग्य लाभलेलं, हे आठवून समाधान मानून घेतलं.
तिथून निघून आधी आम्ही तिथल्या प्रसिद्ध गुरू स्वीट्स मधून म्हैसूरपाक घेतला. इथल्या जीभेवर विरघळणार्या तुपात बनवलेल्या गूळाच्या म्हैसूरपाकाला तोड नाही. तसं हल्ली मुंबईतही काही ठिकाणी हा म्हैसूरपाक मिळतो. पण म्हैसूरूला आल्यावर म्हैसुर सिल्क साडी आणि म्हैसुरपाक मिठाई घेणं हे शास्त्र असतं. ते डावलून कसं चालेल ? बरं म्हैसुर मसाला डोसा तिथे गेले दोन तीन दिवसात खाऊनखाऊन मन तृप्त झालेलं त्यामुळे डोसा पॅक करून घ्यायच्या भानगडीत नाही पडलो.
आता मात्र आम्हाला सरळ बेंगळुरू एअरपोर्टवर जायचं होतं. पण मनातून म्हैसुर क्रेप सिल्क साडी जाईल तर ना ! मग काय परत आनंद आम्हाला म्हैसुरू हायवे वर असलेल्या एका साडीच्या दुकानात घेऊन गेला. इथे मात्र एक नाही तर दोन म्हैसुर क्रेप सिल्क साड्या घेतल्या आणि मन एकदाचं शांत झालं.
तिथून आम्ही बेंगळुरू एअरपोर्टवर वेळेवर पोचलो. आमच्या फ्लाईटची वेळ होईतोवर तिथल्या प्रशस्त लाँज मध्ये खातपीत छान वेळ घालवला आणि फ्लाईटने पुण्याला परतलो.
आणि अशाप्रकारे आमची कूर्ग म्हैसुरू सहल ठरवल्याप्रमाणे अतिशय सुरेख रित्या सुफल संपूर्ण झाली. ह्या सुरेख सहलीच्या आयोजनाचं संपूर्ण श्रेय मात्र गौरी टुर्स च्या गौरीचंच आहे.

© नयना पिकळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताडोबा - जंगल सफारी

   ह्यावर्षीच्या जीवघेण्या उकाड्यात कुठे बाहेर जाणं तर सोडाच पण घरच्या घरीही गरमीचा त्रास सहन होत नाही. अशातच जर नागपूरला जायचा बेत ठरत असेल...