सोमवार, ६ जानेवारी, २०२५

आमची कूर्ग सहल - भाग १

 ह्या वर्षी उन्हाळ्यात कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जायचं हे ठरवलं होतं. पण नक्की कुठे हे मात्र ठरत नव्हतं. सिमला, कुलू मनाली, नैनीताल आणि पृथ्वीवरील स्वर्ग काश्मीर ह्या सर्व ठिकाणी आधी जाणं झालंच होतं. म्हणजे हिमाचलप्रदेश परत इतक्यात नको. बरं ऊटी कोडाईकनाल सुद्धा झालंय. मग कुठे जायचं? असं करत करत शेवटी कर्नाटक मधलं कूर्ग हे हिल स्टेशन नक्की केलं.

चार पाच दिवस कूर्गला जायचं, जास्त दगदग न करता आरामात जितकं फिरणं होईल तितकंच फिरायचं करायचं आणि बाकी मस्त रिलॅक्स करायचं असा प्लान केला. आणि लगेच गेल्या वर्षी काश्मीरला ज्यांच्या सोबत गेलो होतो त्या "गौरी ट्रॅव्हल्स" च्या गौरीलाच फोन लावला.
आमची काश्मीर सहल अतिशय सुरेख झाल्याने आम्हाला गौरीची आणि गौरीला आमची चाॅईस कळली होती. त्यामुळे आम्हाला हवी तशी आणि आमच्या बजेटमध्ये बसेल अशा सहलीचं आयोजन गौरी नक्की करेल ही खात्री होतीच. आणि तो विश्वास खरा ठरला.
आमची ही कूर्ग सहल अतिशय सुरेख झाली.
कूर्ग किंवा ज्याला कोडागु असेही म्हणतात हे कर्नाटक मधलं अत्यंत देखणं हिल स्टेशन. असं वाचलंय की कूर्गला भारताचं स्कॉटलंड म्हणतात. अजून स्काॅटलंडला जायचा योग आलेला नाहिये पण कूर्ग खूपच देखणं आहे हे मात्र नक्की.
कूर्गला जायला ऑक्टोबर ते मे महिन्याच्या काळ सर्वात चांगला. पण आम्ही मे महिन्याच्या अखेरीला गेलो. तरीही आम्हाला आल्हाददायक थंडी, रिमझिम पाऊस आणि स्वच्छ उन्हं असं सारं काही अनुभवता आलं.
आम्ही पुण्याहून पहाटे फ्लाइटने बेंगळुरुला अगदी वेळेवर पोचलो. (हिच ती पुणा-बेंगळुरू फ्लाईट जी पुढच्याच आठवड्यात जवळजवळ नऊ तास लेट झाल्याने फ्लाईट मधील प्रवासी हाणामारीवर उतरलेले). तिथे गौरीने आधीच ठरवलेला ड्रायवर आनंद आम्हाला घ्यायला येणार होता.
हा आनंद इतका punctual होता की आमची फ्लाइट बेंगळुरुला लँड होतानाच watsapp वर त्याचा मेसेज आला की मी सहा वाजता एयरपोर्ट वर आलो आहे. यथावकाश आम्ही एयरपोर्ट बाहेर आलो आणि आनंदशी फोन वर बोलत बोलत कोणत्या गेट वर येऊ असं विचारत विचारत १०-१५ मिनिट फिरत राहिलो.
पण त्याने सांगितलेल्या गेट वर तो काही दिसेना. बरं त्याचं हिन्दी खूपच बाळबोध होतं. आणि इंग्लिश मध्ये सुद्धा नीट सविस्तर समजावून सांगितलं तर त्याला कळायला कठीण जायचं. पण नुसते मुख्य शब्द वापरले तर त्याला चटकन कळायचं. अर्थात हे आम्हाला नंतरच्या २-३ दिवसात लक्षात आलेलं शहाणपण.
एयरपोर्ट वर मात्र आम्ही त्याच्याशी आधी हिन्दी मग इंग्लिश मध्ये संवाद साधायचा खूप प्रयत्न केला. पण त्याला आम्ही आणि आम्हाला तो काही सापडेना. मग शेवटी तिथल्याच एका कर्मचाऱ्याला शरण गेलो आणि त्याला आनंदकडे बोलायला लावले. तेव्हा आम्हाला कळले की आनंद T1 टर्मिनल वर उभा होता आणि आम्ही 2 महिन्यापूर्वीच नवीन उद्घाटन झालेल्या T2 वर उतरलो होतो. आणि मग आनंद T1 वरुन T2 वर आम्हाला घ्यायला आला.
आत्ता येतो आत्ता येतो, 2 मिनिटात पोचतो, 5 मिनिटात पोचतो करत करत तो जवळ जवळ पाऊण तासाने पोचला. आणि ह्या सर्वाला कारण बेंगळुरुचं ट्रॅफिक. बरं त्या आनंदने आमचं इतकं दिलखुलासपणे हसत हसत स्वागत केलं की आम्ही त्याच्यावर चिडायचंही विसरलो. तर हे सगळं रामायण होईपर्यंत नऊ सव्वा नऊ झालेले.
म्हणून मस्त पैकी मसाला डोसा, इडली, वडा सांबार असा अस्सल दक्षिणी नाश्ता करून आम्ही पुढे कूर्गला जायला निघालो. तोवर दहा वाजून गेले होते. रस्ते अतिशय सुरेख, 6 lane असलेले, दोन्ही बाजूला लावलेली छान फुलझाडे, सुंदर आकारात कापलेली शोभिवंत झुडपे, सारं काही मस्त होतं. रस्ते तर इतके गुळगुळीत की पोटातलं पाणीही हलणार नाही.
तर आमचा बेंगळुरुहून मडीकेरी असा गाडीने प्रवास सुरू झाला. प्रवासभर आनंद आम्हाला उत्साहाने मोडक्या तोंडक्या हिंदीत आणि इंग्लिश मध्ये जमेल तितकी माहिती द्यायचा प्रयत्न करत होता .
रस्त्यात मध्येच आम्हाला आंबे असलेली एक हातगाडी दिसली .. पाच सहा वेगवेगळ्या प्रकारचे स्थानिक आंब्यांचे प्रकार - मोरीस, मलगोआ, बदाम, मल्लिका, सुंदरकेसरी ही आंब्यांची नावं. आंबे दिसायलाही मस्त तुकतुकीत आणि चवीलाही उत्तम. मग काय प्रत्येक प्रकारचे 2-2 आंबे घेतले आणि पुढच्या प्रवासाला लागलो .
वाटेत वेगवेगळी गावं लागत होती पण उच्चारायला सुद्धा महाकठीण अशी गावांची नावं. त्यामुळे आधी नावं तोंडपाठ करून लक्षात ठेवायचा प्रयत्न केला पण काही वेळातच नाद सोडून दिला. प्रवासतलं शेवटचं गांव ‘पेरियापट्टण’ मात्र मुद्दाम आवर्जून लक्षात ठेवलं कारण ह्याच्यानंतर लगेच मडीकेरी लागतं आणि कूर्ग येतं.
जसजसे कूर्ग जवळ येऊ लागले तसतसा वातावरणातला बदल जाणवू लागला. उकाडा कमी होऊन हवेतील थंडावा वाढत होता. हिल स्टेशन असलं तरी मे महिना असल्याने गोठवणारी थंडी नव्हती. मस्त हवाहवासा सुखद गारवा होता.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता खांदाभर उंचीची छोटी छोटी झाडं दिसू लागली होती. चकचकित उन्हात चमकणारी हिरवीगार पानं, जणू कोणीतरी नुकताच तेलाचा हात पुसला असावा. नंतर नंतर तर त्या झाडांशिवाय काहीच दिसेना. पाहावं तिथे ह्याच झाडांची दाटी. आनंदला विचारलं ही कसली झाडं ? तर तो म्हणला कॉफीची.
आजवर मी कॉफीचं झाड कधीच पाहिलं नव्हतं. कूर्ग कॉफी प्लांटेशनसाठी प्रसिद्ध आहे हे माहीत होतं. पण कसं असतं कि आपण आपल्या आधीच्या अनुभवांवरून काहीतरी कल्पना मनात केलेल्या असतात. ऊटीला Tea Plantations पाहिली होती म्हणून Coffee Plantations पण तशाच प्रकारची असतील असा काहीतरी वेडगळ समज मनात झाला होता. कॉफीची झाडं प्रत्यक्षात पाहून हा समज दूर झाला.
कूर्गला आम्ही जिथे होम स्टे घेतला होता तो गावाच्या खूप आत होता आणि तिथे पोहोचेतो आम्हाला अडीच वाजले. आमच्या होम स्टे च्या रस्त्याच्या बाजूनेच एक छोटासा ओढा वाहत होता.
पोहोचल्यावर थोडे फ्रेश झालो आणि आम्ही ज्यांच्याकडे राहिलो होतो त्यांनी आणलेले सँडविच आणि कॉफी पिऊन थोड्या वेळाने त्या इस्टेटच्या आजूबाजूचा परिसर पायी चालत जरा फिरून आलो. तितक्यात पावसाने देखील हजेरी लावली आणि हवेतला गारवा आणखीनच वाढला.
चारीबाजूंनी दाट झाडी, पक्ष्यांचा सोडून इतर कसलाही आवाज नाही, कोणाची गडबड नाही, कसलीही लगबग नाही. अतिशय शांत निवांत हवहवसं वाटणारं वातावरण होतं. तो दिवस आम्ही आणखी कुठेही गेलो नाही .
रात्रीच्या जेवणात मस्त स्थानिक पदार्थ होते - करम पुट्टु, टोमॅटो चटणी, कुर्गी पद्धतीचं चिकन, पायसम वगैरे. छान चविने पोटभर जेवलो आणि लवकर झोपी गेलो. रातकिड्यांची साथ सोबतीला होतीच.
सकाळी परत अडई डोसा, ऑम्लेट, उपमा असा भारदस्त नाश्ता करून फिरायला बाहेर पडलो. सर्वात आधी गेलो एलिफेंट दुबारेला.
कावेरी नदीच्या तिरावरच ही एलिफेंट कॅम्प आहे. खरंतर नदीतून पलीकडे कॅम्प पर्यन्त बोटीतून जावे लागते. पण मे महिना असल्याने नदीचं पाणी बऱ्यापैकी सुकलेलं आणि त्यामुळे बोट बंद होती . सगळेचजण चालत नदी पार करून जात होते . पाण्याच्या तळाशी असलेले दगड काही ओबडधोबड, काही गुळगुळीत तर काही निसरडे होते. आता लिहिताना मज्जा वाटत आहे पण त्यावेळी मात्र नदी पार करताना धाबे दणाणले होते . कॅम्प तर बघायचा होता त्यामुळे मनाचा हिय्या करून नदी पार केली . त्यावेळी त्या निसरड्या दगडांवरून नदी पार करणं सुद्धा प्रचंड adventurous वाटलं .
एवढी मेहनत घेऊन नदी पार करून गेलो म्हणून एलिफेंट दुबारे जास्त आवडलं. कारण तिथे हत्ती मात्र मोजून नऊ दहाच होते. केरळ मध्ये कोणत्यातरी उत्सवासाठी इतर हत्तींना नेण्यात आलं आहे असं कळलं.
आणखी एक गोष्ट म्हणजे कूर्गमध्ये आम्हाला रस्त्या रस्त्यावर अधूनमधून आठ-दहा मुलांच्या टोळ्या दिसायच्या. अंगाला आॅईलपेंट फासून, केस रंगवून, त्यातील काहीजण मुलींसारखा वेष करून पैसे मागत फिरत होते. आधी वाटलं कि गोव्यातल्या शिमग्यासारखा काही प्रकार असावा. ड्राईव्हर आनंदला विचारलं (तो मूळ कूर्ग गावचाच) तर तो नुसतेच हसून माहित नाही म्हणाला. होम स्टेच्या रेवथीलाही ह्या बाबतीत काहीच माहिती नव्हते.
पुढचे दोन दिवसही अशाच टोळ्या कुठे कुठे दिसत राहिल्या. पण ती मुलं नक्की कोण होती हे काही कळलं नाही. कसल्या उत्सवासाठी पैसै मागत होती, की दारू पिण्यासाठी पैसे गोळा करत होती कि ते तिथले भिकारी होते शेवटपर्यंत कळलं नाही.
एलिफेंट दुबारे करून मग आम्ही नाम्ड्रोलिंग मठ जो गोल्डन टेम्पल म्हणूनही प्रसिद्ध आहे तिथे गेलो . हा मठ तिबेटी बौद्ध धर्म संबंधित शिक्षणाचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. मठाच्या परिसरात गौतम बुद्ध, व इतर तिबेटी गुरूच्या भव्य सोन्याच्या मूर्त्या आहेत. प्रवेशद्वारावर सोन्याचे नक्षीकाम आहे. मठाच्या भिंतींवर अनेक तिबेटीयन आणि बौद्ध पौराणिक कथा चितारलेल्या आहेत व रंगीबेरंगी नक्षीकाम केलेलं आहे. पण इथलं सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे सुमारे चाळीस फुट उंचीची गौतम बुद्धाची सुवर्ण प्रतिमा. ह्या भव्य परिसरात शाळा, कॉलेज, हॉस्पिटल सर्वच आहे आणि आजूबाजूला तिबेटी वस्तूंची दुकाने देखील आहेत. मठाचा परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि मन प्रसन्न करणारा आहे .
दुपार झालीच होती त्यामुळे तिथेच स्थानिक पद्धतीचं जेवण जेवलो आणि तिथून कुशल नगरला गेलो. इथलं मार्केट प्रसिद्ध आहे. साहजिकच ते मस्त गजबजलेलं होतं. कधीही पाहिले नाहीत इतक्या प्रकारचे मसाले, वेगवेगळ्या फ्लेवरची कॉफी आणि चहा, चोकॉलेट (कूर्ग होममेड चोकॉलेट आणि लोकल वाइन साठी प्रसिद्ध आहे) व इतर असंख्य गोष्टींची दुकाने इथे होती. आम्ही मात्र नुकतंच जेवण झाल्याने काहीतरी गोड हवं म्हणून तिथे फक्त आइसक्रीम खाऊन बाजूलाच असलेल्या निसर्गधाम उद्यानाकडे वळलो.
निसर्गधाम हे खरंतर कावेरी नदीतलं एक अतिशय छोटं बेट आहे. ह्या बेटावर जाण्यासाठी दोरीचा एक पूल बांधलेला आहे. ह्या पूलावरून बेटावर जायला मस्त मजा आली. निसर्गधाम मध्ये चंदनाची आणि बांबूची अनेक झाडं आहेत. उद्यानात अनेक ठिकाणी बसायला सुरेख बाकडे घातले आहेत . तिथे Bird Park आणि Deer Park आहे . Bird Park मध्ये तुम्ही पक्ष्यांना खायला देऊ शकता. पक्षी आपल्या हातावर बसून दाणे टिपतात. आम्ही इथे असतानाच अचानक जोरदार पाऊस सुरू झाला आणि आम्हाला देखील काहीवेळ त्या पक्ष्यांसोबत पिंजऱ्यात कैद व्हावं लागलं. पाऊस ओसरताच तिथून निघालो आणि आमच्या घरी (“सिल्वर ब्रूक इस्टेट”) पोचलो. गरमा गरम कॉफी घेतली आणि मस्त गप्पा गोष्टींमध्ये रमलो.
आज खरंतर खूप फिरलो होतो, भटकलो होतो पण थकवा मात्र थोडासाही जाणवत नव्हता. पावसाची येजा, पक्ष्याचा किलबिलाट, अधूनमधून रातकिड्यांचा आवाज अशात हळुहळु अंधारू लागलं. रात्री परत चविष्ट जेवण झालं आणि सहलीचा दूसरा दिवस संपला .
तिसऱ्या दिवशी सर्वात आधी निघालो तल कावेरीला. आम्ही राहात असलेल्या मडीकेरी पासून हे ठिकाण सर्वात लांब ५० - ६० किलोमटर वर होतं. त्या मुळे तिथून सुरुवात करून मग वाटेवरची इतर स्थळं पाहात मागे यायचं असं ठरलं.
ब्रह्मगिरी पर्वतावर असलेल्या ह्या ठिकाणी कावेरी नदीचा उगम आहे. कावेरी ही संपूर्ण कर्नाटक आणि चेन्नईला पाणी पुरवणारी दक्षिणेतील महत्त्वाची नदी. कूर्ग मध्ये एका चौकात कावेरी मातेची मोठी मूर्ती सुद्धा आहे.
आम्ही सकाळी मंदिरात पोहोचल्याने वातावरण अतिशय थंड होतं आणि गर्दीही अजिबात नव्हती. तल कावेरीला स्वयंभू शिवलिंग असलेलं एक प्राचीन शिवमंदिर आहे. पण आम्हाला अपेक्षित होतं तसं कावेरीची मूर्ती असलेलं मंदिर वगैरे नाही . तिथे कावेरीचं कुंड आहे आणि त्याच्याच अगदी बाजूला कावेरीच्या पाण्याभोवती एक छोटासा चौकडा बांधून तो छान सुशोभित केला आहे . तिथेच कावेरी मातेला दिवा लाऊन फुले अर्पण केली जातात. कावेरी नदीला कोणतेही मूर्त स्वरूप न देता तिच्या नैसर्गिक स्वरूपाची होत असलेली पूजा मनाला सुखावून गेली. मंदिरा बाहेर येऊन जवळ जवळ १२०० मिटर उंचीवरुन आजूबाजूच्या परिसराचं जे काही दृश्य पाहिलं ते केवळ विलक्षण आणि दिव्य असं होतं .
तिथून मग आम्ही एबी फॉल्स पाहायला गेलो . वाटेवर दोन्ही बाजूला कॉफीची बागायत, इतर अनेक प्रकारची झाडे आणि पक्ष्यांचा कानाला सुखावणारा किलबिलाट. सुमारे १०-१५ मिनिट चालत गेल्यावरही आम्हाला काही धबधब्याचा खूप मोठा आवाज येईना. संपूर्ण वाटेवर मोठमोठी झाडं असल्याने अगदी जवळ पोहोचे पर्यन्त धबधब्याचा अंदाज येईना. नंतर मात्र पाण्याचा आवाज यायला लागला. पावसाळ्यात प्रचंड वेगाने कोसळणारा हा धबधबा आम्ही गेलो तेव्हा मात्र अगदीच रोडावला होता. पाणी कोसळत होतं, पाण्याला वेगही होता पण त्याचं ते ऐकलेलं भव्य दिव्य रूप काही आम्हाला पाहायला मिळालं नाही. आजूबाजूला पर्यटकांची गर्दीही वाढत होती आणि दुसरे काहीच पाहण्यासारखे नसल्याने तिथे मग जास्त वेळ काढला नाही .
नंतर पोचलो ओंकारेश्वर मंदिरात. पण बहुतेक इथेही आमची यायची वेळ चुकली आणि मंदिर बंद होते. ते मंदिर बारा वाजता बंद होते असे तिथे लिहिले होते आणि नुकतेच बारा वाजलेही होते. त्यामुळे मंदिर बंद झाले असावे. पण तिथे संपूर्ण शुकशुकाट होता. मंदिराच्या परिसरात देखील एखादा माणूस किंवा दुकान काहीही दिसले नाही . थोडे वाईट वाटले पण मग दिवसाची सुरुवात स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाने झाली होती म्हणून मनाची समजूत काढली.
इथून मग गेलो मडिकेरीचा किल्ला पाहायला . किल्ल्याच्या सुरुवातीलाच एक छोटेसे म्यूझियम आहे. तिथे अगदी आठव्या दशकातील काही प्राचीन देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळाल्या. वाराही, कौमारी, वारुणी, इंद्राणी, ब्रह्माणी सारख्या आजवर मी केवळ दुर्गाकवचात वाचलेल्या देवीच्या नावांच्या भग्न का होईना पण प्रत्यक्ष मूर्त्या पाहायला मिळाल्या म्हणून हे म्यूझियम कायम लक्षात राहील. शिवाय त्या काळची वेगवेगळी नाणी, शस्त्रे, भांडी ही देखील छानप्रकारे योग्य माहिती लिहून मांडून ठेवली होती. ब्रिटिश काळातील काही पेंटिंग्स सुद्धा होती. मडिकेरी किल्ल्याचा परिसर अतिशय स्वच्छ ठेवला आहे. मूळ किल्ल्याचे भग्न अवशेष वगैरे नाहीत कारण आता तिथे सरकारी इमारती बांधल्या आहेत आणि किल्ल्याच्या परिसरात एक छान टुमदार चर्च मात्र आहे.
तिथून गेलो जवळच्याच राजा का सीट नावाच्या उद्यानात. हे कूर्गच्या राजाचे विहार स्थान. उद्यानात ठिकठिकाणी अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलझाडे, फुलांचे गालिचे, शोभिवंत वृक्ष, कारंजे, जनावरांच्या आकर्षक रंगातल्या आकृत्या वगैरे आहेत. शिवाय तिथे लहान मुलांसाठी एक छोटी झुकझुकगाडी आणि मोठ्यांसाठी Zip Line Adventure सारख्या गोष्टी सुद्धा होत्या. लहान मोठे सर्वच उत्साहाने त्याचा आनंद घेत होते. उद्यानातून आजूबाजूच्या संपूर्ण परिसराचे आणि खालच्या दरी खोऱ्याचे अतिशय देखणे असे दृश्य दिसत होते. इथला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी लोक विशेष गर्दी करतात.
आम्हाला गेले दोन तीन दिवस जिथे पाहू तिथे कॉफीची झाडं दिसत होती आणि म्हणून कॉफी कशी बनते हे पाहण्याची उत्सुकताही होती. म्हणून मग आमच्या सांगण्यावरून आमचा ड्रायवर आनंद आम्हाला एका अशा कॉफी प्लांटेशनवर घेऊन गेला जिथे आम्हाला ही सगळी प्रोसेस नीट पाहता येईल. तिथे आम्हाला एक गाइड करावा लागेल असं सांगण्यात आलं. खरंतर आम्हाला फक्त प्लांटेशन मधून थोडा फेरफटका मारायचा होता आणि कॉफी कशी बनते हे बघायचं होतं. त्यासाठी गाइड कशाला हवा ? पण गाइड शिवाय आत प्रवेश नव्हता. शिवाय गाइड साठी ५-१० मिनिटं थांबव लागणार होतं. आम्ही कंटाळत नाईलाजाने वाट पाहत उभे राहिलो. १० मिनिटांनी आमचा गाइड आला . गाइड होता २०-२२ वर्षांचा आफ्रिदि. तिथेच जवळपासच्या कॉलेज मधून कृषिशास्त्र म्हणजे agricultural engineering करणारा विद्यार्थी. अतिशय उत्साही आणि तितकाच हुशार आणि तल्लख. खऱ्या अर्थाने कृषिशास्त्राची आवड असणारा.
आफ्रिदिने आम्हाला तिथे फक्त कॉफीच्या झाडांचे प्रकारच नाही तर इतर शेकडो फळांची फुलांची झाडे दाखवली. त्यांना नुकतीच आलेली छोटी छोटी फूलं फळं ह्यांची सविस्तर माहिती दिली. त्या कॉफी प्लांटेशनचे मालक होते “आपाया” आणि त्यांनी सुमारे ३०० एकर जमिनीत जी काही विलक्षण लागवड केली होती ती केवळ थक्क करणारी होती. मिरची, चिकू, पेरू, सफरचंद, चेरी आणि इतर असंख्य फळं आणि फुलांच्या आजवर कधीच न ऐकलेल्या आगळयावेगळ्या जाती त्यांनी प्रयोग म्हणून लावल्या होत्या. त्यातील काही यशस्वी होत होत्या तर काहींवर अजून प्रयोग चालू होते. मसाल्यांच्या तर अगणित प्रकारच्या वेली, झुडपं, झाडं पाहिली. अनेक गोष्टी हातात घेऊन न्याहाळल्या, चाखल्या, सुगंध घेतला. प्लांटेशनच्या फेरफटक्या नंतर तिथेच मोफत काॅफीचा आस्वादही घेतला, कॉफी कशी बनते हेही पाहिलं आणि काही मसाले आणि कॉफीची खरेदी सुद्धा केली. खूपच मजा आली. ५-१० मिनिटांसाठी म्हणून गेलेलो आम्ही २-३ तासांनी तिथून बाहेर पडलो.
ज्या आफ्रिदि सोबत जायला सुरुवातीला नाराज होतो आता परत जर तिथे जायचं असेल तर केवळ तोच गाइड हवा म्हणून तासभर थांबायची सुद्धा तयारी आहे. हो म्हणजे केवळ त्या प्लांटेशनवर जाण्यासाठी कूर्गला परत जायची माझी तरी तयारी आहे. संध्याकाळचे ते ३ तास कायम स्मरणात राहतील इतके सुरेख गेले.
त्या सुखद स्मृति घेऊन आम्ही आमच्या होम स्टे वर परतलो . सांगायचं राहून गेलं की आम्ही जो होम स्टे घेतलेला तो रेवथी आणि योगेश ह्या जोडप्याचा आहे. दिल्लीच्या ताज मध्ये शेफ असलेल्या योगेशने नोकरी सोडून आपल्या जन्मगावी कूर्गमध्ये येऊन राहण्याचा निर्णय घेतला आणि पत्नी रेवथीच्या साथीने हा होम स्टे सुरू केला. अगदी घरगुती वातावरण आणि प्रेमळ आगत्यशील असं हे जोडपं. आम्हाला सकाळ संध्याकाळ आमची आवड विचारून काही हवं नको ते जातीने पाहून त्याप्रमाणे नाश्ता जेवण बनवायचे.
रेवथीच्या मोकळ्या स्वभावाइतकाच तीचा गळाही सुरेल होता. आमची पहाट पक्ष्यांच्या किलबिलाटात, तिने गायलेल्या सुरेल गाण्याने होत होती. त्या रात्री देखील रेवथीने आम्ही नको नको म्हणत असताना आम्हाला कराओके ट्रॅक वर गाणी गायला लावली. आधी लाजत बुजत गाणाऱ्या आमचाही काही मिनिटातच मस्त गळा खुलला आणि आम्ही गाणं नाच सगळं दिलखुलासपणे एंजॉय केलं.
रेवथीने गौरीच्या सांगण्यावरून आमच्यासाठी सरप्राईज केक कटींगची खास अरेंजमेंट केली होती. रेवथीच्या ह्या स्वभावामुळे अगदी आमचंच घर वाटावं इतका मोकळेपणा आमच्यात आला होता. आम्ही तिथे फक्त ३ दिवस होतो म्हणून बरं नाहीतर आम्हाला ते आमचंच घर वाटून कायमचं तिथे राहायला आम्ही कमी केलं नसतं. तो दिवसही असा छान गेला.
त्यानंतरच्या दिवशी सकाळी नाश्ता करून तृप्त मनाने पण भरलेल्या अंतःकरणाने आम्ही परतीच्या प्रवासाला सुरूवात केली.

( क्रमश : )
© नयना पिकळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताडोबा - जंगल सफारी

   ह्यावर्षीच्या जीवघेण्या उकाड्यात कुठे बाहेर जाणं तर सोडाच पण घरच्या घरीही गरमीचा त्रास सहन होत नाही. अशातच जर नागपूरला जायचा बेत ठरत असेल...