काही गोष्टी आपण ठरवतो तर काही गोष्टी आपल्यासाठी आधीच ठरवल्या गेलेल्या असतात ह्यावर माझा तरी पक्का विश्वास आहे . आणि ह्याचं प्रत्यंतरही हल्लीच मिळालं.
आता पाहा नं, कुठेही लांबच्या सहलीला किंवा प्रवासाला जायचं म्हटलं की त्यासाठी तारखा ठरवणं, बजेटींग करणं, सुट्टी मिळवणं वगैरैची तयारी आपण दीड दोन महिने तरी आधी करायला सुरूवात करतो. पण आमची काश्मीर सहल इतकी अचानक ठरली की विचारू नका. त्याचंही झालं असं की आम्ही महिनाभर आधीपासून अमृतसरला जायचं ठरवत होतो आणि एक दिवस सतीशच्या पुण्याच्या मावसभावाशी फोनवर बोलता बोलता आमची काश्मीर सहल फायनल झाली सुद्धा.
आमच्या ह्या सहलीचे आयोजक होते पुण्याचे Gauri Tours & Travels.
तर सर्व प्रथम आम्ही मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते श्रीनगर असा फ्लाईटने प्रवास करून काश्मीरला पोहोचलो. दुपारी सुमारे बारा सव्वा बारा वाजता एअरपोर्टवरून बाहेर आलो आणि टॅक्सीमध्ये बसलो. आम्ही आलो होतो पृथ्वी वरच्या स्वर्गात . “अगर धरती पर कही जन्नत है तो बस यहीं है यहीं है यहीं है” हे वाक्य अगदी शाळेपासून मनात घर करून बसलं होतं . त्यामुळे मनात अपार उत्सुकता होतीच .
पण आजूबाजूला नजर गेली आणि मन थोडं धास्तावलंच. वातावरण अतिशय सुखद पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला दर 100 मिटर अंतरावर CRPF चे जवान मशिनगन घेऊन अगदी अलर्ट मोड मध्ये तैनात. शिवाय चौकाचौकावर बारामुल्ला, कारगील, लालचौक, पुलवामा, अनंतनाग ह्यांचे मार्ग दर्शवणारे बोर्ड्स. नाही म्हटलं तरी थोडं दडपण आलंच. आजवर फक्त टीव्ही आणि समाचार पत्रातूनच ही ठिकाणं ओळखायची सवय होती. आज मात्र आम्ही प्रत्यक्ष तिथे होतो . मन अशा दोलायमान स्थितीत असतानाच Safa Hotels जवळ आमची टॅक्सी थांबली.
आमचं पहिल्याच दिवशीचं जेवण श्रीनगरच्या ह्या हाॅटेलमध्ये होतं. काश्मीरी पुलाव, भरलेले दमआलू, काश्मिरी साग (पालक आणि मायाळू ह्यांच्याशी साम्य असलेली एक पालेभाजी), दालफ्राय आणि गाजराचा हलवा असा शुद्ध शाकाहारी बेत . पण प्रत्येक पदार्थ इतका उत्कृष्ट की आजही चव जीभेवर आहे.
तिथून परत टॅक्सीने आम्ही नगीनलेक वर आलो . नगीनलेकच्या हाऊसबोटवर आमचं 2 night stay होतं. हाऊसबोटवर जाण्यासाठी शिकारांची रांग लागलेली.
सूर्य पश्चिमेला वळलेला, आकाशात संध्याकाळची रंगपंचमी नुकतीच सूरू झालेली, नगीनलेकचं थंडगार पाणी, हवेतला गारवा, निवांत परिसर, तळ्यातल्या पाण्यात अधूनमधून दिसणारी बदकं व इतर पक्षी आणि चारीबाजूंनी ऊंचंच ऊंच पहाड. अतिशय सुखावणार्या स्वर्गीय वातावरणाची अनुभूती अशी अगदी पहिल्याच दिवशी मिळाली आणि मन भरून आलं.
तसं दाललेक मध्येही हाऊसबोट्स मध्ये राहाण्याची सोय आहे. पण तिथे पर्यटकांची भरपूर गर्दी, शिकार्यातून हाऊसबोटपर्यंत जायला जेमतेम दोन तीन मिनिटं लागत असावीत आणि तिथल्या हाऊसबोट्स सुद्धा बर्यापैकी सामान्य वाटल्या. अर्थात हे नंतर पुढचे काही दिवस दाललेक वरून ये जा करतानाचं निरीक्षण आहे.
त्यामानाने नगीनलेक मधल्या हाऊसबोट्स एकदम राजेशाही, जणू महालच. हाऊसबोटच्या भिंती, सिलींग, खिडक्या, दरवाजे, बाल्कनी सगळीकडे अक्रोडाच्या लाकडावर केलेलं अप्रतिम कोरीवकाम, प्रशस्त दिवाणखाना, बेडरूम्स आणि खाली वितभर जाडीचा मऊमऊ गुबगुबीत अखंड गालिचा पसरलेला. हा देखील अनुभव कायमचा आठवणीत राहाण्यासारखा.
शिवाय चहाला तसंच सकाळ रात्र जेवायला किंवा बाहेर फिरायला जायचं असेल तर हाऊसबोटवरून शिकारा करून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
दरवेळी शिकाऱ्यातून 10 -15 मिनिटांची फेरी मारायची संधी मिळायची. त्यामुळे मन पूर्णपणे तृप्त होईपर्यंत शिकार्यात हिंडाफिरायला मिळालं.
नगीन लेकवर शिकार्यातून फिरताना दरवेळी आणखी एक सोबत असायची ती म्हणजे बाजूच्या शिकार्यातून फुलं, शाली, टोप्या, पर्सेस वगैरे विकणार्यांची. आम्ही निघतानाच ठरवलेलं की काश्मीरहून केशराशिवाय काहीही खरेदी करायचं नाही. पण ह्यांच्याकडे असलेली व्हरायटी पाहून पहिल्याच दिवशी आमचा निर्णय पार धूळीस मिळाला आणि खरेदीचा श्रीगणेशा सुरू झाला.
शिवाय ही माणसं फार मायेने आपुलकीने जवळीक साधायचा प्रयत्न करत होती. त्यांच्या वागण्यात मात्र कुठेही लोचटपणा किंवा अगतिकता नव्हती. त्यांचं काश्मीर आम्हालाही आवडावं, आम्ही त्यांच्या काश्मीरचं कौतूक करावं असं एक आर्जव मात्र होतं जे त्यांच्या वागण्यातून, देहबोलीतून स्पष्ट जाणवत होतं . पर्यटन हाच तिथला मुख्य व्यवसाय असल्याने
गेली काही वर्ष दहशतवादा मुळे आणि गेली दोन अडीच वर्ष कोवीडमुळे काश्मीरची आर्थिक स्थिती अतिशय खालावलेली आहे ह्याची खंत त्यांच्या बोलण्यात होती. म्हणूनच मग त्यांच्याकडे खरेदी करताना फारशी घासाघीसही कराविशी वाटली नाही, असो.
तिथूनच आम्ही मग एक दिवस सोनमर्गला गेलो. तिथली हिरवीकंच कुरणं म्हणजे निसर्गाने मैलोनमैल पृथ्वीवर पांघरलेले हिरवेहिरवे गार गालिचेच जणू. आणि समोर जिथे पहावं तिथे बर्फाळ शुभ्र डोंगर. नजरबंदी करणारं असं हे दृष्य. अगदी अर्ध्याहून जास्त दिवस सोनमर्गला यथेच्छ राहून, मजा करूनही येताना तिथून पाय निघत नव्हता.
त्यानंतर गेलेल्या ट्यूलीप गार्डनमध्ये मात्र बर्यापैकी निराशा झाली. आम्ही ज्या अपेक्षेने गेलेलो त्यामानाने खूपच कमी फुलं आम्हाला पाहायला मिळाली. गेल्या काही वर्षांपासून ट्यूलीप गार्डन हे काश्मीरचं मुख्य आकर्षण झालेलं आहे आणि ट्यूलीप्सच्या बहराचा मोसमसूद्धा मार्च एप्रिलच आहे. पण ह्या वर्षीच्या Heat Wave मुळे सगळी फुलं वेळेआधीच कोमेजली आणि आम्हाला जेमतेम 20% बहर पाहायला मिळाला. शेवटी निसर्गापुढे कोणाचं काय चालणार. पण जे काही आमच्या पदरात पडलं ते सौन्दर्य सुद्धा इतकं देखणं होतं की पूर्ण बहरात असताना हे गार्डन किती सुंदर दिसत असेल ह्याची कल्पना डोळ्यांपुढे आली.
त्यानंतर आम्ही गेलो पहलगामला . तिथे जाताना एके ठिकाणी पुढचा मार्ग जरा sensitive असल्याने CPRF च्या जवानांनी आमची बस अडवून आम्हाला दुसर्या मार्गाने जाण्यास भाग पाडले. जवळजवळ 20किमी चा जास्तीचा फेरा पडला. असे प्रसंग आले की मनात धाकधूक सुरू व्हायची. पण पहलगाम आलं आणि परत एकदा मनावरचं मळभ दूर झालं. आमच्या हाॅटेलसमोरच खळखळाट करत वाहणारी लिद्दर नदी आणि समोरच्या पाहाडावर ऐसपैस पसरलेले पाईन्सचे वृक्ष. नयनरम्य असं हे दृष्य पाहिलं आणि सर्व शीण नाहिसा झाला.
पहलगामला आम्ही अरूव्हॅली, चंदनवारी ग्लेसियर आणि बेताब व्हॅली पाहीली.
पहलगामलाच अमरनाथला दरवर्षी जाणार्या यात्रेकरूंचा पहिला तळ असतो . संपूर्ण खडकाळ, पहाडी, उंचसखल असा हा प्रदेश . इथून यात्री अमरनाथ पर्यंत पायी चालत जातात. खरंच त्यांच्या श्रद्धेला, जिद्दीला प्रणाम.
अरू व्हॅली मध्येच 'बजरंग भाईजान' चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट करण्यासाठी सलमान खानने महिनाभर तळ ठोकलेला असं आमच्या ड्रायव्हरने सांगितलं. तिथले रस्ते इतके अरूंद होते की एक गाडी जेमतेम जाऊ शकेल आणि तरीही दोन्ही बाजूंनी अगदी सफाईदारपणे ड्रायव्हर्स गाड्या चालवत होते. समोरून गाडी आली की आमच्याच पोटात गोळा यायचा.
चंदनवारी ग्लेसियरला सुद्धा सर्वांनी बर्फात भरपूर मजा केली. इथे अमरनाथ यात्रेचा दुसरा तळ आहे. इथून अमरनाथ केवळ 32किमी वर आहे.
बेताब चित्रपटाचं शुटींग जिथे झालं ती बेताब व्हॅली. तिथे सुद्धा सुखद हिरवीगार कुरणं. घाट चढताना उतरताना एकाबाजूने लिद्दर नदी तर दुसर्याबाजूने पाईन्स वृक्ष सोबतीला. एक क्षणही दोघांनी साथ सोडली नाही. कधी संपूच नये हा प्रवास असे वाटणारे क्षण इथे पदोपदी येत होते.
पहलगामहून परतताना आम्ही बॅट फॅक्टरी आणि कार्पेट फॅक्टरी पाहायला गेलो.
काश्मीरी विलो ह्या वृक्षाचं लाकूड वापरून बॅट्स कशा बनतात हे इथे सविस्तरपणे पाहाता आलं.
कार्पेट फॅक्टरी मध्येही ज्यांना आवड होती त्यांनी कार्पेट विव्हिंग कसं करतात हे पाहिलं.
आम्हाला सध्या तरी क्रिकेट खेळण्यात इंटरेस्ट नसल्याने आम्ही एक छोटीशी अर्धा फूट उंचीची बॅट आठवण म्हणून खरेदी केली आणि कार्पेटमध्ये मात्र खूपच इंटरेस्ट निर्माण झाल्याने सरळ एक मोठं कार्पेटच खरेदी केलं .
भर दुपारी रखरखत्या उन्हात(वातावरणात थंडावा असला तरी इथली दुपार रखरखीत होती) अवंतिपूरला गेलो.
इथे जमीनीखाली गाढल्या गेलेल्या सुमारे १२०० वर्षांपुर्वीच्या प्राचीन विष्णूमंदीराचे अवशेष पाहिले.
तिथल्या दगडी भितींवरच्या देवदेवतांच्या कोरीव मुर्त्या आज भग्नावस्थेत असल्या तरी त्यावरून मंदीराच्या भव्यतेची सहज कल्पना येत होती.
गुलमर्गचा प्रवास देखील कायम आठवणीत राहील असा. इथल्या गोंडोला राईडवरून (rope way) आम्ही Phase 1 ला गेलो. इथेच ते 'जयजय शिव शंकर काँटा लगे ना कंकर' गाण्यातलं प्रसिद्ध शिवमंदीर आहे.
आम्ही Phase 1 लाच थांबून इथल्या नयनरम्य परिसरात वेळ घालवला. काही जणांनी घोड्यावरून सैरसपाटी केली तर काही बर्फावर खेळले .
पुढचा गोंडोला राईडचा Phase 2 चा मार्ग मात्र खूपच steep होता. बघूनच जीव घाबराघुबरा होत होता. आमच्यातलं कोणीच Phase2 ला गेलं नाही.
त्यानंतर आम्ही श्रीनगरला आलो आणि तिथली लोकल ठिकाणं फिरलो. ट्युलीप गार्डन मध्ये जे गमावलं ते आम्ही शालिमार आणि निशात बागेत कमावलं. नजर ठरत नव्हती, डोळ्यांचं पारणं फिटून फिटत नव्हतं. इतक्या देखण्या फुलांची उधळण की काही विचारू नका. कारंजी, रंगीबेरंगी नाजूक फुलांचे कोरीव नक्षीदार गालिचे, नाजूक वेलींच्या हिरव्यागार कमानी, डौलदार आकार दिलेले सुरेख वृक्ष, छोटीछोटी झुडूपं आणि झाडं. काय पाहू, काय नको आणि काय काय नजरेत साठवू असं होत होतं. दोन्ही बागांमध्ये मनसोक्त फिरलो आणि आयुष्यभरासाठी आठवणी साठवूनच तिथून परतलो.
इथली हजरतबल दर्गा सुद्धा पाहिली. पण बाहेरूनच. कारण ‘त्यांच्या’ प्रथेप्रमाणे स्त्रियांना आत जायची परवानगी नसते आणि म्हणूनच मलाही कधीच अशा ठिकाणी जाण्यात काहीच स्वारस्य नसतं.
Last but not the least आमच्या सहलीच्या शेवटच्या दिवशी ज्याची मी अगदी पहिल्या दिवसापासून किंवा सहल ठरल्यापासून जे स्थळ पाहाण्याची वाट पाहात होते तो क्षण आला. श्रीनगरचा 371 इ.पू.काळचा 1000 फूट उंचीवर असलेला आदीशंकराचार्यांचा मठ आणि शिवमंदीर.
वेदांत विषयात एम. ए. केल्याने आधीच शंकराचार्यांबद्दल मनात नितांत आदर आणि श्रद्धा आहेच आणि म्हणून मठाच्या पायर्या चढताना क्षणोक्षणी अंगावर रोमांच ऊठत होते. कधी एकदा मठात जाऊन दर्शनाचा विलक्षण अनुभव घेते असं होत होतं.
मठाच्या पायर्या बर्यापैकी steep आणि rough होत्या पण चढण अगदीच अशक्य नव्हती. शिवाय आम्ही पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाल्याने उन्हाचाही त्रास नाही जाणवला.
वरती शंकराचार्यांचं तपस्यास्थान आहे. अतिशय छोटीशी अशी जेमतेम पाच बाय पाच फुटांची दगडी गूहा. पण तिथे गेल्यावर जे पावित्र्य जाणवतं ते शब्दातून सांगता नाही येणार.
तपस्यास्थानाच्या आणखी थोडं वर 15/20 पायर्या चढल्या की तपस्यास्थाना इतकंच छोटं शिवमंदीर. जवळजवळ दोन फूट ऊंच आणि फूटभर विस्ताराची भव्य शंकराची पिंड. तिथलं वातावरणही तितकंच शुद्ध आणि पवित्र अनुभूती देणारं. संपूर्ण परिसरात एकप्रकारचं भारावलेपण जाणवत होतं. पर्यटकांची गर्दी असूनही कुठेही गडबड गोंधळ किंवा बजबजाट नसलेलं. मनाला निवांत शांतता लाभली इथे.
तर अशाप्रकारे कधी ध्यानीमनीही नसलेलं आणि तरीही कदाचित कुठेतरी मनाच्या सूप्तावस्थेत असलेलं काश्मीर पाहाण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं.
काश्मीरच्या ह्या अविस्मरणीय प्रवासात साथीला होता इथला निसर्ग, इथले नगीनलेक, गोल्डनलेक आणि दाललेक, चिनार आणि पाईन वृक्षांनी नटलेल्या दर्या, बर्फाळ शुभ्र डोंगर, सिंध, झेलम आणि लिद्दर नद्या, शालीमार आणि निशात बाग आणि बरच काही जे मनात कायमचं घर करून राहणार आहे .
काश्मीर फिरताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इथले सामान्य नागरीक अतिशय प्रेमळ, आतिथ्यशील आहेत. खूप आपुलकीने वागणारे आहेत. मी सहसा जाती धर्मावर कधी लिहित नाही पण संपूर्ण काश्मीरमध्ये मला १% सुद्धा हिंदू काश्मीरी नाही दिसले. अगदी अवंतिपुर मधल्या विष्णूमंदिराचा गाईडसुद्धा मुस्लिम होता. जे काही दोन चार हिंदू दिसले ते फक्त शंकराचार्यांच्या मठाजवळ. पण हो सोनमर्गला मात्र चक्क सातार्याकडच्या एकांनी हाॅटेल उघडलं आहे जिथे आम्हाला गरमागरम चमचमीत पिठलं भाकरी खायला मिळाली.
पण जर काश्मीरचा खरंच विकास करायचा असेल तर तिथल्या सामान्य जनतेला प्रोत्साहन देणं, तिथल्या वातावरणानुसार विविध व्यवसायांना उत्तेजन देणं खूप गरजेचं आहे .
देशाच्या घाणेरड्या राजकारणात दरवेळी भरडला जातो तो सामान्य माणूसच .
म्हणूनच वाटतं की जर ह्या पृथ्वीवरच्या निसर्ग निर्मित स्वर्गाचं सौन्दर्य अबाधित राखायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न मात्र आपण माणसांनीच केले पाहिजेत.
आमच्या काश्मीरच्या ह्या सहलीचं आयोजन केलं होतं पुण्याच्या गौरी आणि सिद्धार्थ ह्यांनी . त्यांच्या Gauri Tours & Travels ने आमच्या फ्लाइटची तिकीट सोडल्यास बाकी A to Z सगळं काही organise केलं होतं. आम्ही जिथे जिथे राहिलो ती हॉटेल्स, प्रत्येक ठिकाणचं जेवण, फिरण्याचा खर्च, सारं काही अतिशय सुरेख होतं.
गौरी आणि सिद्धार्थ अगदी जातीने लक्ष घालून सर्वांच्या सोई, आवडी निवडी शक्य तितक्या सांभाळायचा मनापासून प्रयत्न करत होते. त्यासाठी वेळप्रसंगानुसार अनेक तडजोडी व बदलही त्यांनी केले. त्यामुळे आमचं नातं पर्यटक आणि आयोजक असं न राहाता ते आमचे आता कुटुंबियच बनले आहेत.
काश्मीर सारख्या sensitive प्रदेशात सहल आयोजित करणं आणि पर्यटकां बरोबरच काश्मीर मधल्या लोकल लोकांनाही सांभाळून घेणं हे सर्व दोघांनी अतिशय छान रित्या केलं. त्यासाठी गौरी आणि सिद्धार्थ ह्यांचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत.
Gauri Tours&Travels बरोबर ह्यापुढेही अशा सहलींना जायला मनापासून आवडेल हे वेगळं सांगायलाच नकोय खरतर.
©नयना पिकळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा