शनिवार, २५ जानेवारी, २०२५

ताडोबा - जंगल सफारी

  ह्यावर्षीच्या जीवघेण्या उकाड्यात कुठे बाहेर जाणं तर सोडाच पण घरच्या घरीही गरमीचा त्रास सहन होत नाही. अशातच जर नागपूरला जायचा बेत ठरत असेल तर काय म्हणावं ? मला तर हा बेत ऐकूनच सर्वांनी वेड्यात काढलं . इथेच दिवसभर इतकं हा हू करतेस तिथे जाऊन काय करणार आहेस ?


पण कसं आहे ना की जर ह्याच सीझनमध्ये राजबिंड्या वाघोबाचे दर्शन व्हायचे चान्सेस सर्वात जास्त असतील तर इतकी कळ तर सोसायलाच हवी. म्हणूनच मग नागपूरचा उन्हाळा सहन होईल का ? तिथलं झणझणीत तिखट जेवण पचेल का ? वगैरे बद्दल फार विचार न करता आम्ही ताडोबा ट्रीपवर शिक्कामोर्तब केलं.

नागपूरला गेल्यागेल्या सकाळी आधी तिथल्या सुप्रसिद्ध रामजी शामजी मध्ये तर्री पोहे, सामोसा खाल्ले. चव दोन्हीची सुरेख होती. सामोसा तर एकदम क्लास. शिवाय तिखटावर गोड हवंच म्हणून नंतर जिलेबी पण स्वाहा केली. 😋😋

पोटोबा शांत झाल्यावर मग आम्ही तिथून ताडोबाला गेलो.

ताडोबाला आम्ही एकूण तीन सफारी केल्या. त्यातल्या दोन सफारींमध्ये आम्हाला वाघ दिसले 🐅🐅.

तिसर्या सफारीत मात्र वाघोबा झाडीत दडून बसला होता. कसले रोजरोज येऊन त्रास देतात म्हणून रुसून बसलेला बहुतेक . फक्त अधूनमधून डरकाळ्या फोडून मी आहे बरं का इथेच असं सांगायला विसरत नव्हता .

आम्ही आपले आता दिसेल, अस्सा कालच्या सारखाच बाजूने जाईल, म्हणून आशेने दीड दोन तास एकाच ठिकाणी दबा धरून (जीपमध्येच 😜) बसलेलो. पण छे ! वाघोबा आमच्यापेक्षा हुश्शार ! शेवटपर्यंत नाही तो नाहीच आला.

पहिल्या दिवशी मात्र सकाळी आणि दुपारी दोन्ही सफारींमध्ये अतिशय उमदे वाघ आणि वाघिणी दिसल्या. त्यांची नावं सुद्धा काय तर नयनतारा, छोटा मटका, विरप्पन, झुलाबाई अशी भन्नाट होती.

त्यातली नयनतारा तर आमच्या जीपला जवळजवळ घासूनच गेली. इतकी जवळून गेली की कॅमेरात तिला क्लिक करायचंही भान नाही राहिलं. खरंतर भितीच वाटली की आमच्या हालचालने बिथरली तर ! म्हणून ती थोडी लांब जाईपर्यंत आम्ही सगळेच काहीही हालचाल न करता शांत उभे होतो.

पण ज्या गोष्टीसाठी आलेलो ते वाघोबादर्शन मात्र अगदी भरभरून मिळालं. वेगवेगळ्या ठिकाणी, झोपलेले, बसलेले, पाण्यात पहुडलेले, रस्ता ओलांडताना असे वेगवेगळ्या पोझीशन मधले वाघ डोळे भरून पाहिले. त्यांचं ते देखणं रूप, तो राजेशाही वावर, तो डौल सारं काही जबरदस्त. खूप छान वाटलं.

ताडोबा जरी वाघांसाठी प्रसिद्ध असलं तरी इथे कोतवाल, किंगफिशर, भारद्वाज, लाकुडतोड्या, वेडाराघू, पॅराडाईज फ्लायकॅचर आणि इतर अनेक देखणे पक्षी सुद्धा पाहायला मिळाले.

त्याबरोबरच मोर, तितर, काळवीट, रानडुक्कर, रानगवा, नीलगाय, सांबर, हरिणांच्या अनेक जाती सुद्धा पाहिल्या. काही ठिकाणी प्राणी नव्हते तिथे जीप मधून नुसतं जंगलातून फिरतानाही जबरदस्त वेगळं फिलिंग होतं.

ताडोबाची ही ट्रीप म्हणजे खरच एक पूर्णपणे वेगळा अनुभव होता. महत्त्वाचं म्हणजे दिवसभर जंगलात उघड्या जीपमधून फिरताना, उन्हं रखरखीत असूनही अजिबात त्रास झाला नाही आणि तिथलं तिखट, तेलकट, चमचमीत जेवणही अजिबात बाधलं नाही. एकूण खूप धमाल केली आणि मनापासून एन्जाॅय केली ही ट्रीप.


©नयना पिकळे

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

अयोध्यायात्रा आणि त्रिस्थळी - भाग ८

  आठवा दिवस

गेल्या आठ दिवसात आम्ही उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश अशी तीन राज्य फिरलो. भरपूर ठिकाणं पाहिली आणि भरपूर प्रवासही केला . बसमधून प्रवास करताना नाजूक पिवळ्या फुलांनी बहरलेली सरसोंची शेतं आमची सोबत करायची. सूर्याच्या प्रकाशात तो चकाकता पिवळा गालिचा डोळ्यांना दिपवायचा.
आम्ही ज्या ज्या हाॅटेल्समध्ये राहिलो ती सुद्धा चांगली होती. जेवण सगळीकडे खास उत्तरभारतीय पद्धतीचं. पनीर, पुरी भाजी, समोसा, कचोरी ह्यांचीच रेलचेल.
आठ दिवसांपैकी मला वाटतं एखाद दुसरा दिवस सोडला तर रोज गोड पदार्थात पनीर-माव्याचे लुसलुशीत आणि रसरशीत गुलाबजाम होते त्यामुळे सतीश एकदम खुश होता. तर अशी ही आमची सहल आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचली होती.
आज खरंतर आमचा सहलीचा शेवटचा दिवस . पण दोन दिवसांपुर्वी प्रयागला त्रिवेणी संगमावर गेलेलो तेव्हा मनासारखं दर्शन झालं नव्हतं म्हणून काहीजणांनी पहाटे साडेपाचला उठून परत तिथे जायचं ठरवलं .
आम्ही काहिजणं हाॅटेलवरच राहिलो.
पहाटे संगमावर बोटीतून गेलेल्यांना अगदी मनासारखं दर्शन झालं, पूजा करता आली आणि स्नानही करता आलं त्यामुळे त्यांचीही इच्छा पूर्ण झाली.
मग आम्ही सगळेच सामानाची बांधाबांध करून बसने प्रयागच्या विमानतळावर पोचलो. हे विमानतळ आधी आर्मीसाठी वापरले जायचे .
अतिशय छोटे पण नीटनेटके असे हे विमानतळ आहे.
आम्ही अगदी वेळेवर पोचलो पण बरोबर त्याच दिवशी सकाळी पाऊस पडला होता आणि सगळीकडे धुकं पसरलं होतं. त्यामुळे असेल पण फ्लाईट सुद्धा तीस चाळीस मिनीटं उशीरा आली.
मग वेळ जाता जाईना म्हटल्यावर कोणी लाडू, बिस्कीटं, चिवडे काढले तर कोणी राजगीरा लाडू आणि सुका मेवा काढला. काहीजणांनी तेवढीच संधी साधून दुकानात कपडे आणि पुस्तकं खरेदी केली. कोणी काॅफी तर कोणी सॅन्डवीच तर कोणी पोहे खाल्ले.
शेवटी एकदाची फ्लाईट आली आणि आम्ही सगळेच फ्लाईटने सुखरूप घरी पोचलो. अशाप्रकारे आमची अयोध्या यात्रा आणि त्रिस्थळी सुफळ संपूर्ण झाली.
ह्या सहलीत अनेक नवीन ओळखी झाल्या, जीवाभावाच्या नवीन मैत्रिणी मिळाल्या ज्यांचा स्नेह आयुष्यभर असाच राहणार आहे. त्या सर्वांसोबत आणखीही अनेक सहली होतच राहतील ज्याविषयी लिहिल्यावर तुम्हालाही कळेलच.

(समाप्त )
© नयना पिकळे

अयोध्यायात्रा आणि त्रिस्थळी - भाग ७

 सातवा दिवस

आज आम्ही चित्रकुटला जाणार होतो. इथेच राम आणि भरताची भेट झाली होती आणि भरत श्रीरामाच्या पादुका घेऊन आला होता.
श्रीरामांना अनेक प्रकारे समजावूनही ते अयोध्येला परत येत नाहीत म्हणून भरतानेही अयोध्येत पाऊल न ठेवता अयोध्येबाहेर असलेल्या नंदीग्रामात पादुकांची स्थापना केली आणि १४ वर्ष व्रतस्थ राहून इथूनच अयोध्येचा राज्यकारभार पाहिला होता.
म्हणून सर्वात आधी आम्ही नंदिग्रामला गेलो.
भरताने रामाकडून १४वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत यायचे वचन घेतले होते. रामाला यायला एक दिवस जरी उशर झाला तरी भरत प्राणत्याग करणार होता.
म्हणूनच रामाने आपण परत येत आहोत हि खबर देण्यासाठी आधी हनुमानाला भरताच्या भेटीला पाठवले.
भरत आणि हनुमानाच्या भेटीचे एक सुरेख मंदिर नंदिग्रामात आहे. दोघांचीही गळामिठी दाखविणार्या मूर्त्या अतिशय देखण्या आहेत.
तिथेच बाजूला एका गुहेत श्रीरामांच्या पादुकांचेही मंदिर आहे आणि नंतर भरत श्रीराम ह्यांच्याही भेटीचे मंदिर आहे. ह्यात श्रीरामांच्या मूर्तीचा एक पाय जरासा वरती आहे.
लाडक्या भावाला दीर्ध काळानंतर भेटतानाची उतावीळ स्थिती ह्यातून मूर्तीकाराने अचूक दाखवली आहे.
फारशी गर्दी नसल्याने इथे अगदी निवांत दर्शन झालं.
इथे २०१९ पासून पुढील चौदा वर्ष अखंड रामनामाचा जप सुरू आहे.
गावातील सगळे तासतासभर येऊन ह्या पवित्र कार्याला हातभार लावतात.
तिथे रोज दुपारी भंडारा असतो.
पुजारी आम्हाला भंडार्यात जेवूनच जायचा प्रेमळ आग्रह करत होते .
पण आम्हाला पुढे आणखी खूप ठिकाणं पाहायची असल्याने नाईलाजाने नाही म्हणावं लागलं.
ह्या परिसरात सुद्धा भरपूर माकडं आहेत.
तिथून पुढे चित्रकूटला अत्री ऋषी आणि सती अनुसूयेच्या आश्रमात गेलो.
एकदा अत्री ऋषींना तपस्येनंतर तहान लागली होती तेव्हा त्यांची तहान भागविण्यासाठी सती अनुसूयेने गंगेची प्रार्थना केली आणि गंगा मंदाकिनी नदीच्या रूपात इथे प्रकट झाली होती .
आश्रमा जवळच असलेले मंदिकिनीचे उगमस्थान पाहिले.
वनवासाला निघालेले राम लक्ष्मण आणि सीता इथे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आहे होते. अत्री ऋषींच्याच सांगण्यावरून रामाने वनवासातील काही काळ चित्रकूटात घालवला असल्याने हे स्थळ खूप पवित्र मानले जाते.
श्रीरामासाठी विश्वकर्माने बांधलेली एक भली मोठी दगडी गुंफा इथे आहे. गुंफेचे तोंड खूपच अरूंद होते वाकतवाकत आत जावे लागले.
आत बर्यापैकी कोंदट पण थंड वातावरण होतं. आतमध्ये ठिकठिकाणी राम हनुमान शंकर ह्यांच्या मूर्त्या होत्या.
तिथेच गुहेत एकीकडे खटखटा चोर लिहिलेला बोर्ड दिसला. पायर्या चढून वर जाऊन नमस्कारही करून आलो.
खाली उतरल्यावर राहूलने गोष्ट सांगितली ती अशी की एकदा सीतामाई स्नान करताना इंद्राचा पुत्र जयंत तिला चोरून पाहात होता.
तेव्हा संतापून लक्ष्मणाने त्याला पकडले आणि गुहेतच उलटे टांगून ठेवले.
गोष्ट ऐकून आम्ही परत वर पाहिले तर तिथेच गुहेच्या वरच्या बाजूला एक काळी दगडी आकृती टांगल्यासारखी दिसली. हाच तो खटखटा चोर.
असं म्हणतात कि इथे वास्तव्य असताना सीतेला स्वयंपाकासाठी पाणी मिळावं म्हणून गोदावरी नदी गुहेतच प्रकट झाली.
ह्या नदीचा उगमही ह्या गुहेतच आहे आणि ती लूप्त सुद्धा ह्याच गुहेत होते.
म्हणून तिला गुप्त गोदावरी म्हणतात.
तिथून मग बसने हनुमान धारा बघायला गेलो. हे मंदिर कामदगिरी पर्वतावर खूप उंचावर असल्याने आम्ही रोपवे ने गेलो.
लंकादहना नंतर होत असलेली शरीराची आग कमी व्हावी म्हणून हनुमानाने श्रीरामांची प्रार्थना केली.
तेव्हा श्रीरामांनी जमिनीत बाण मारून एक जलधारा बाहेर काढली.
ही पाण्याची धार सतत हनुमानाच्या शरीरावर पडत असल्याने त्याचा दाह कमी झाला.
म्हणून ह्या जागेचे नाव हनुमान धारा. इथेही खाली आल्यावर वानरांचा सुळसुळाट आहे.
इथून मग 'रामायण दर्शन मंदिर' नावाच्या एका अनोख्या मंदिरात गेलो.
मंदीराच्या आवारातच हनुमानाची भव्य मूर्ती आहे .
खरंतर हे मंदिर कमी आणि संग्रहालय जास्त वाटत होते.
इथे अनेक दालनातून रामायणातील जवळजवळ सर्वच मुख्य प्रसंग, भलीमोठी भित्तीचित्रे आणि मूर्त्यांच्या आधारे वेगवेगळ्या माध्यमातून साकारलेले होते.
त्या चित्रातील आणि मूर्त्यांमधले भाव विलक्षण जिवंत वाटत होते. दालनाच्या बाहेर वेगवेगळ्या भाषेतील रामायणाचे ग्रंथ काचेच्या कपाटात ठेवलेले होते.
आपले वाल्मिकी रामायण, रामचरितमानस, आनंद रामायण, अध्यात्म रामायण वगैरे तर होतेच पण तिथे अगदी चायनीज, बर्मीज, नेपाळी, श्रीलंकन आणि इतर सर्वच देशात प्रसिद्ध असलेले रामायणाचे ग्रंथ मांडून ठेवले होते.
संपूर्ण विश्वभरात श्रीरामां विषयी असलेली ही अपार श्रद्धा पाहून काय वाटलं ते शब्दात नाही सांगता येणार.
तिथून बाहेर पडलो आणि भूकेची जाणीव झाली. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. आज दुपारचं जेवणच झालं नव्हतं. समोरंच एक छोटंसं हाॅटेल होतं तिथे मग चहा बिस्कीटं आणि त्या हाॅटेलच्या मालकाने प्रेमाने बनवलेले ब्रेड पॅटीस चाट खाऊन पोट भरून घेतलं. आणि बसमध्ये बसून पुढचा प्रवास सुरू झाला.
मध्येच 'सतना' जवळ मेघा आणि तिच्या मिस्टरांना सोडले कारण सतनाहून त्यांची रात्री मुंबई साठीची ट्रेन होती.
आम्ही सर्व दुसर्या दिवशी दुपारी फ्लाईटने जाणार असल्याने आम्हाला परत चार पाच तास प्रवास करून आता प्रयागला पोहोचायचे होते.
परत ट्रॅफीकने भरलेला रस्ता आणि आमचा बस ड्रायव्हर फुल्ल स्पीडमध्ये बस नेतोय आपला. जरी वेगाने चालवत असला तरी त्याचा व्हीलवर पूर्ण कंट्रोल होता. म्हणूनच खचाखच ट्रॅफिक असलेल्या रस्त्यावरून त्याने आम्हाला रात्री पावणेदहाला सुखरूप हाॅटेलवर आणून सोडलं.

(क्रमशः)
© नयना पिकळे

अयोध्यायात्रा आणि त्रिस्थळी - भाग ६

 सहावा दिवस

आज सकाळी नाश्ता करून आम्ही नेहमीप्रमाणे लवकरच अयोध्येहून प्रयागला जायला निघालो.
हा प्रवास जवळजवळ सहा तासांचा होता . पण मध्ये चहा आणि जेवणासाठी थांबावे लागले, शिवाय प्रचंड ट्रॅफिक, ह्या सर्वामुळे प्रयागला पोचायला संध्याकाळचे चार वाजले.
हाॅटेलवर पोचून जरा फ्रेश झालो आणि लगेचच त्रिवेणी संगमावर जायला निघालो. इथे सुद्धा काही अंतरापर्यंतच बसला परवानगी आहे. त्यानंतर टोटो करावी लागते.
आम्ही सर्वांनी मिळून चार टोटो केल्या.
प्रयागला माघ महिन्यात मेळा असतो. हा मेळा म्हणजे मिनी कुंभमेळा म्हणायला हरकत नाही . जिथवर नजर जाईल तिथवर लहान लहान तंबू बांधलेले होते.
जागोजागी मांडव घालून प्रवचनं चालू होती. कुठे गीता प्रवचन, कुठे रामचरितमानस तर कुठे भागवत सप्ताह.
मध्येच कुस्तीसाठी आखाडेही बांधलेले होते.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला जत्रा असल्यागत छोटी छोटी दुकानं होती. पुजेचं सामान, खायच्या वस्तू, खेळणी, साड्यांचे स्टाॅल्स.
तिथेच कितीतरी साधू बाजूलाच बसून चिलीम ओढत होते, कोणी तिथेच भर रस्त्याच्या कडेला चहा बनवत होतं तर कुणी काय शिजवत होतं.
आमच्या रिक्षा निघताना एकत्रच निघाल्या पण कधी कुठे कसे आम्ही एकमेकांपासून हरवलो कळलेच नाही.
पाहावं तिथे फक्त गल्ल्याच गल्ल्या आणि राहुट्या. कुठेही घाटाजवळ पोचल्याची खूण म्हणून पाणी दिसत नव्हतं कि बाहेर पडायचा मार्गही कळत नव्हता .
भुलभुलैय्या म्हणजे काय ते आम्ही त्यादिवशी अनुभवलं. चारही टोटो चार वेगवेगळ्या दिशांना कितीतरी वेळ एकमेकांना शोधण्यासाठी धावत होत्या.
मध्येच समोरचा रस्ताच बंद व्हायचा मग परत फिरून दुसरीकडे टर्न मारायची.
प्रत्येक कोपर्यावर आमचा टोटो चालक इतरांना फोन करून ते कुठे आहेत विचारायचा.
कोण गेट नंबर ४च्या घाट नंबर २ वर, तर कुणी गेट नं ४च्या घाट नंबर ५वर, तर कोणी गेट नंबर ६वर होते.
फोन करत करत शेवटी जवळजवळ दीड दोन तासांनी आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्रिवेणी संगमाजवळच्या एका घाटावर गेलो.
तिथून अंधारातच जरा लांब दिसणारा संगम पाहिला. तिथेच मग पाय बुडवून नमस्कार केला आणि प्रोक्षण करून समाधान मानलं.
तिथूनच पुढे एक हनुमानाचं मंदिर होतं . पण ते पाहायला पूल वरून जावं लागणार होतं. आणि पूल बराच मोठा होता. १५-२० मिनीटांचं तरी चालणं होतं.
पूलवरून टोटो ला जायला अर्थातच पोलीस परवानगी देत नव्हते.
मग हो नाही करत दुसर्या मार्गाने टोटोने आम्ही त्या मंदिरात गेलो.
इथे हनुमानाची अतिशय भव्य अशी आडवी झोपलेली मूर्ती आहे.
असं म्हणतात कि हनुमानाने श्रीराम आणि लक्ष्मणाला अहिरावण महिरावणाच्या तावडीतून सोडवले त्यानंतर त्याने इथे विश्रांती घेतली होती म्हणून अशी आडवी मूर्ती.
हेही दर्शन अगदी मनासारखं झालं. त्या दिवशी मग इतक्यावरच आवरतं घेत आम्ही हाॅटेलवर आलो. जेवलो आणि झोपी गेलो.

(क्रमशः)
© नयना पिकळे

अयोध्यायात्रा आणि त्रिस्थळी - भाग ५

  पाचवा दिवस

दुसर्या दिवशी आमचा अयोध्येचा प्रवास सुरू झाला. आज सर्वांमध्ये एक वेगळीच उर्जा जाणवत होती.
आधी राहूलने सर्व देवतांच्या नावांचा रोजच्या प्रमाणे गजर केला. मग सर्वांनी रामरक्षा म्हटली, भीमरूपी, हनुमानचालिसा वगैरे झालं.
आमच्यातील सुप्रियाताई, रोहिणीताई कुलकर्णी, माधुरीताई जोशी , अविनाश भाऊजी आणि मिस्टर जोशी सर्वांनीच अतिशय सुरेल आवाजात रामरायांची भजनं गायली. आमची संपूर्ण बस अगदी राममय झाली होती.
दुपारी अयोध्येला पोचलो आणि हायवे जवळच्या जानकी रसोई मध्ये जेवलो.
सध्या अयोध्येला रामललाच्या दर्शनाला जाणार्या भक्तांसाठी देशभरातून मोफत ट्रेन्स आणि बसेस सुटत आहेत.
अयोध्येत त्यांच्यासाठी राहाण्याची आणि खाण्याची सोय सुद्धा मोफत केलेली आहे.
त्यामुळे अयोध्येला प्रचंड गर्दी होती.
गर्दीमुळे एका विशिष्ट क्षेत्रापुढे बसेसना परवानगी नव्हती.
बसमधून उतरून आम्हाला कमीत कमी 3-4 किलोमिटर चालावं लागणार होतं .
त्यामुळे हायवे जवळच बस सोडली आणि आम्ही निघालो.
राहूलने म्हटलं कि श्रीरामाच्या दर्शना आधी मारूतीरायाचं दर्शन घ्यायचं असतं म्हणून आम्ही आधी हनुमानगढीत हनुमानाचे दर्शन घ्यायचे ठरवले.
हायवेवरून आधी टोटो (तिथे रिक्षाला टोटो म्हणतात) करून काही अंतर पार केलं. तिथून पुढे रिक्षालाही मज्जाव होता.
मग तिथून दीड दोन किलोमिटर चालत गेलो.
रस्त्यावर बघावं तिथे माणसांचे लोंढेच्या लोंढे .
सर्वंच जण एका वेगळ्याच उत्साहाने तोंडाने अखंड रामनामाचा गजर करत पुढे जात होते.
त्या सर्वांमधून कशीबशी वाट काढत आम्ही हनुमानगढी जवळ पोचलो. तिथे रस्त्याच्या मध्यावर डिव्हायडर जवळच सर्वांच्या चपलांचे खच पडले होते.
आम्ही सर्वांनी सुद्धा समोर कोणतं दुकान आहे ती खूणगाठ मनात बांधून एकीकडे चपला बूट ठेवले आणि हनुमान गढीच्या पायर्या चढायला सुरूवात केली.
राहूलने सांगितलं कि श्रीरामांनी शरयु नदीत आपला अवतार संपवते वेळी चिरंजीवी असलेल्या हनुमानावर अयोध्येला सांभाळायची जबाबदारी सोपवली होती. अयोध्येचा पालनकर्ता असल्याने सर्वांवर नजर ठेवता यावी म्हणून त्याचे इथले स्थान असे उंचावर आहे.
इथे दर्शनासाठी मरणाची गर्दी होती. तरीही कुठेही धक्काबुक्की चेंगराचेंगरी नव्हती.
मुख्य मंदीराकडे तर लोकांची ही गर्दी असल्याने आधी आतील मारुतीरायाचे नीट दर्शनच होईना.
तरी आम्ही तिथेच न हलता नेटाने दोन तीन मिनीटं उभे राहिलो आणि मग मात्र अतिशय सुरेख दर्शन झालं.
मग बाहेर येऊन आधी चपला शोधल्या . सर्वांच्या चपला अस्ताव्यस्त झालेल्या तरी सापडल्या.
राहूलच्या बिचार्याच्या चपला मात्र काही केल्या मिळेनात . कितीतरी वेळ तो शोधत बसलेला. पण नाहीच मिळाल्या.
त्याला म्हटलं नवीन घे तर म्हणाला शनिवारी चपला खरेदी करत नाहीत.
मग तो आमच्यासोबत तसाच अनवाणी चालला सगळीकडे.
तिथून मग आम्ही आमच्या मुख्य लक्ष्याकडे निघालो. २०/२५ मिनिटं चालत राममंदिराच्या बाहेर पोचलो. तिथे तर भक्तांचा पूर लोटलेला.
पोलीस बंदोबस्त मात्र ठिकठिकाणी होता आणि ते सर्वांना मदतही करत होते.
योग्य मार्गदर्शन देत होते. आमच्यातील २/३ जणांना पायाचा त्रास असल्याने त्यांनी व्हिलचेअर केली आणि त्यांना दुसर्या मार्गाने मंदिरात नेण्यात आलं.
व्हिलचेअर वरून न्यायला आणायला त्यांचेच कर्मचारी होते.
मग आम्ही बाकीचे सगळे चपला ठेवायला आधी चप्पल स्टॅन्डवर आणि मग मोबाईल आणि इतर सामान ठेवायला लाॅकर साठी लाईनीत उभे राहिलो.
दोन्ही कडे इतकी प्रचंड रांग होती कि सगळं करून प्रत्यक्ष दर्शनाला जायला आम्हाला जवळजवळ तासभर लागला.
त्यानंतर आम्ही मुख्य मंदिराकडे निघालो. भल्यामोठ्या आवारात लाखो लोकांची गर्दी होती.
पण कुठेही आरडाओरडा नाही, धक्काबुक्की भांडणं काहीही नाही.
सगळेजण एकमेकांना समजून घेत प्रेमाने अगदी शिस्तीत पुढे जात होते.
पोलीस बंदोबस्ता सोबतच तिथे इतरही अनेक कर्मचारी देखरेख करण्यासाठी होते.
प्रत्येकजण हसतमुख आणि आपल्या कामात तत्पर.
अगदी स्वतःहून येऊन काही हवं नको विचारत होते, हवी ती मदत करत होते.
ह्याबाबतीत त्या सर्वांचं खरच कौतुक वाटलं. न कंटाळता हसर्या चेहर्याने दररोज लाखो भक्तांची सोय पाहाणं म्हणजे खायचं काम नाही.
चालत चालतच आम्ही पायर्यांजवळ पोचलो. पायर्या चढल्या आणि भोवतालच्या सभामंडपाची भव्यता नजरेत भरली.
सोन्याने मढवलेले ते दिमाखदार भव्य सभामंडप आणि अगदी लांबूनच दिसणारी रामललाची ती गोजिरवाणी श्यामल मूर्ती .
अगदी लांबूनच मूर्ती दिसत असल्याने जवळ जाईपर्यंत अगदी डोळ्यांचं पारणं फिटेपर्यंत दर्शन घेता आलं.
आजपर्यंतच्या आयुष्यात सगळीकडे राम लक्ष्मण सीता आणि हनुमान अशाच श्रीरामांच्या दर्शनाची सवय झाली होती.
पण श्रीरामांचं हे बाळरूप अतिशय लोभसवाणं. कितीही पाहिलं तरी मनाची तृप्ती होतच नव्हती.
मूर्तीजवळ गेल्यावर आम्ही आमच्याकडे असलेल्या अक्षता रामललावर घातल्या. तिथे गर्दी असल्याने कोणालाच थांबायला देत नव्हते तरी जरा पुढे गेल्यावर तिथल्या एका सिक्यूरिटीने आमच्या रेंगाळण्याकडे मुद्दामच काणाडोळा केला आणि आणखी दोन मिनीटं दर्शनाचं सूख आम्ही उपभोगलं.
आम्ही सगळेच मंत्रमुग्ध अवस्थेत होतो.
मंदिरा बाहेर आलो तर आवारातही एकीकडे छोटीशी राममूर्ती पालखीत ठेवून तिथे रामाचं भजन चालू होतं . सगळं वातावरणच अतिशय भारावलेलं असं होतं.
बाहेर आलो आणि परत मोबाईल आणि चपलांसाठी तितकाच वेळ रांगेत उभे राहिलो.
मग तिथे प्रसाद मिळत होता तो घेतला, कोणाला दान करायचे होते त्यांनी रितसर पावती फाडली.
काहींनी मंदीरातल्या हुंडीतच पैसे दान केले होते.
व्हिलचेअरवाले दहा मिनिटात स्पेशल दर्शन झाल्याने तासभर आमची वाट बघत बाहेर बसलेले.
मंदिराच्या बाहेर पडेतो संध्याकाळ होऊन गेली होती. अंधार पडू लागला होता.
राहूल आम्हाला विचारत होता कि दशरथ महल आणि कनक महल पाहायचा आहे का म्हणून .
खरंतर चालून चालून सगळेच थकले होते आणि मुख्य रामदर्शन मनासारखं झाल्याने फारशी कोणी उत्सुकताही दाखवली नाही.
पण आमच्यातील काहींना लता मंगेशकर चौक मात्र पाहायचा होता. म्हणून मग सरळ तिथेच जायचं ठरलं.
तिथे जाण्यासाठी परत एक दीड किलोमिटर सरळ चालत जावं लागणार होतं.
सर्वांना उत्साह दांडगा पण पायात तर बळ नाही. म्हणून मग त्या मुख्य रस्त्यावर वाहनांना परवानगी नसल्याने आम्ही टोटो करून जरा लांबच्या रस्त्यावरून तीन चार किलोमिटरचा फेरा मारून चौकाजवळ आलो.
वाटेत बाहेरूनच कनक महालाचे ओझरते दर्शन आम्हाला घडले.
लता मंगेशकर चौकात एक भलीमोठी चांदीची वीणा ठेवलेली आहे. अतिशय कल्पकतेने वीणेचे प्रतीक वापरून गानसम्राज्ञीला दिलेली ही मांनवंदना खूप आवडली.
आपल्या हक्काचं काहीतरी पाहात आहोत असं वाटलं कारण लतावर आपल्या सर्वांचाच हक्क आहे.
आजूबाजूला शोभेची फुलझाडं लावून ती जागा सुशोभित केली आहे. तिथल्या मार्गावरही देखण्या दिव्यांचा लखलखाट केलेला आहे.
पण तरीही त्या वीणेसोबत लता मंगेशकरची सुद्धा एक लहानशी का होईना मूर्ती हवी होती असे मला तरी सारखे वाटत राहिले.
आता मात्र रात्र झाल्याने हाॅटेलवर परतायचे होते. पण त्याआधी लांब कुठेतरी पार्किंगमध्ये असलेली आमची बस आम्हाला गाठायची होती.
आता इथे एक वेगळाच किस्सा झाला.
त्या बस ड्राईव्हरला फोन केला तर तो नक्की कुठे उभा आहे हे त्यालाच सांगता येईना. कुठल्या तरी एच पी पेट्रोल पंपचं फक्त तो नाव घेत होता.
मग काय परत टोटो करून निघालो सगळे. टोटो काही अंतर गेली आणि थांबली. तिथून दुसरी टोटो केली . तीसुद्धा काही अंतरापलिकडे जाईना.
कारण काही सिक्युरिटी कारणामुळे सर्व टोटोंना ठराविक क्षेत्र नेमून दिलेली आहेत असे कळले.
मग काय तिथेच उभं राहून आता काय करावं ह्या विचारात आम्ही सर्वच होतो.
आम्हाला असे भर रस्त्यावर उभे पाहून तिथल्या पोलीसांनी आमच्यासाठी एक बस थांबवली.
सरकारने अयोध्येत येणार्या रामभक्तांसाठी गावातल्या गावात फिरण्यासाठी ही पूर्णपणे मोफत सुविधा ठेवलेली आहे.
आम्ही बसमध्ये बसलो तरी आमच्या बस ड्राईव्हरचा पत्ता काही कळेना.
शेवटी ह्या सरकारी बसमधूनही मध्येच एके ठिकाणी उतरलो. परत तिथून दुसर्या एका पोलीसाच्या मदतीने दुसरी बस मिळाली.
त्या बसने शेवटी आम्हाला योग्य त्या पेट्रोल पंप जवळ पोचवलं .
पण पेट्रोल पंप जवळ कुठेही आमची बस दिसेचना.
फोन केला तर पेट्रोल पंपच्या पार पलिकडे दुसर्या बाजूला आमची बस उभी होती .
आम्हाला पाहून बसमधला मुलगा धावत धावत आम्हाला बोलवायला आला म्हणून कळलं तरी.
कारण तोवर प्रज्ञा आमची बस दिसत नव्हती म्हणून दुसर्याच बाजूला बसला शोधायला गेलेली.
मग परत कदम दो कदम करत आम्ही पाय कसेबसे रेटत बसपर्यंत गेलो आणि एकदाचे बसमध्ये धप्पकन बसलो.
वाटेत प्रज्ञाला पिक अप केल आणि पोचलो एकदाचे हाॅटेलवर.
कोणाच्याही अंगात त्राण उरलं नव्हतं. पण कसेबसे चार घास जेवलो आणि झोपी गेलो.
आजही मोबाईल कुठेच अलाऊड नसल्याने फार कमी फोटो आहेत.

(क्रमशः)
© नयना पिकळे

अयोध्यायात्रा आणि त्रिस्थळी - भाग ४

 दिवस चौथा

काल आम्ही बोधगया पाहिली होती आजचा दिवस आम्ही हिंदू गया पाहणार होतो.
सर्वात आधी आम्ही विष्णूपद मंदिरात गेलो. इथे काळ्या दगडातील विष्णूच्या पदचिन्हांची पूजा होते.
या विषयीची राहूलने आम्हाला सांगितलेली कथा अशी की "त्रिपुरासुराच्या वधानंतर धार्मिक वृत्तीच्या त्याच्या पुत्राने, गयासूराने तपस्या करून ब्रह्माचे वरदान मिळवले की तो ज्याच्याकडे पाहील तो स्वर्गात जाईल. अशा प्रकारे सगळेच स्वर्गात जायला लागले आणि स्वर्गात जागा कमी पडू लागली.
तेव्हा सर्व देव विष्णूकडे मदत मागायला केले.
विष्णूच्या सांगण्यावरून देवांनी गयासूराकडे यज्ञासाठी त्याचे शरीर मागितले. त्याने आनंदाने सत्कार्यासाठी ते दिले आणि पाच कोस पसरलेल्या त्याच्या शरीरावर यज्ञ झाला.
शेवटी विष्णूने त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याला पाताळात पाठवले. त्यावेळी गयासुराने विष्णूकडे वर मागितला कि या क्षेत्री जो पिंडदान करेल त्याच्या पूर्वजांना मोक्षप्राप्ती होईल."
तिथून जवळच मंगळागौरीचे मंदिर आहे. देवी सतीच्या शरीराचे भाग जिथे जिथे पडले तिथे शक्तिपीठे निर्माण झाली अशी मान्यता आहे.
इथे देवी सतीचे स्तन पडले अशी मान्यता आहे. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे जागृत शक्तिपीठ मानले जाते.
मुख्य देऊळ अतिशय लहान असून आतमध्ये पूर्ण काळोख आहे.
हे देऊळ म्हणजे एक अतिशय छोटीशी चिंचोळी गुहाच आहे. एकावेळी फक्त एकच जण तेही पूर्ण वाकूनच आत जाऊ शकतं.
आतमध्ये फक्त एका मोठ्या परातीत तुपाची मंद वात बारा महिने चोवीस तास तेवत असते.
त्या मंद प्रकाशात देवीचे ते दर्शन विलक्षण गूढ वाटावं असंच होतं.
मन मात्र एका वेगळ्याच पवित्र भावनेने भारावून गेलेलं जाणवलं.
इथून मग फल्गु नदी पाहायला गेलो. इथे सीतेने महाराज दशरथांना त्यांच्याच सांगण्यावरून वाळूचे पिंड बनवून त्यांचे तर्पण केले होते.
म्हणून तिथे वाळूचे पिंडदान करण्याची पद्धत रूढ झाली.
तिथल्या घाटावर ठिकठिकाणी पिंडदान आणि श्राद्धकार्य चालू होती.
तिथून निघेतोवर दुपार झाली होती आणि सर्वांनाच भुका लागल्या होत्या. मेघाला तिथला प्रसिद्ध पदार्थ "लिट्टी चोखा" मिळण्याचं एक ठिकाण माहिती होतं.
पण आम्हाला काही ते सापडलं नाही आणि सकाळपासून मनात असल्याने "लिट्टी चोखा" तर खायचाच होता.
मग एकिकडे बस थांबवून काही स्थानिक लोकांना विचारत विचारत एका टपरीवजा छोट्याशा दुकानात "लिट्टी चोखा" मिळाला.
पण ती टपरी पाहून आमच्यातील काहींनी स्वतःकडे असलेले लाडू चिवडा भेळ खाणं जास्त पसंत केलं.
आम्ही मात्र त्या "लिट्टी चोखा"चा मनापासून आस्वाद घेतला.
कोळशावर भाजलेल्या खरपूस लिट्ट्या आणि बटाट्याचा चोखा आणि आग्रह करकरून प्रेमाने वाढत होती ती माणसं.
खूप मजा आली. काहीतरी खरखूरं स्थानिक खाल्ल्याचं समाधान मिळालं.
आजचे फोटो खूपच कमी आहेत कारण कुठेही मोबाईलची परवानगी नव्हती.
तिथून परत आमची वरात बसमध्ये बसली आणि पुढील प्रवास सुरू झाला.
हा प्रवास परत चार पाच तासांचा होता. त्यारात्री परत वाराणसीलाच पहिल्या दिवशी उतरलेल्या हाॅटेल एलिगन्स मध्येच आमचा मुक्काम होता.
पहिल्या रात्री वाराणसीत राहिलेलो तेव्हा तिथलं बनारसी पान खायचं राहून गेलेलं .
ते लक्षात ठेवून प्रज्ञाने आवर्जून सर्वांसाठी रात्रीच्या जेवणानंतर बनारसी पान मागवलेलं.
तोंडात विरघळणार्या त्या बनारसी पानाची चव अजूनही जीभेवर रेंगाळते आहे.
दुसर्या दिवशी अयोध्येला जायचं होतं. त्यामुळे आम्ही सगळीच जणं रात्री थकल्या शरीराने पण उत्साही मनाने झोपी गेलो.

(क्रमशः)
© नयना पिकळे

अयोध्यायात्रा आणि त्रिस्थळी - भाग ३

 तिसरा दिवस

आमचा तिसरा दिवस रात्री साडेबारालाच सुरू झाला.
अंघोळ वगैरे करून तयार होऊन रात्री दीड वाजता खाली हाॅटेलच्या रिसेप्शनमध्ये सर्वांनी भेटायचं असं प्रज्ञाने सांगितलं होतं.
तिथून बसने काशी विश्वेश्वर मंदीरात पहाटे तीन वाजताच्या मंगल आरतीसाठी जायचं होतं. प्रज्ञाने आम्हा सर्वांसाठी तो स्लाॅट बूक केला होता.
रात्री सव्वादोन वाजता बसने आम्हाला एके ठिकाणी सोडलं आणि तिथून जवळ जवळ २०-२५ मिनीटं चालत आम्ही मंदीरात गेलो.
आमच्या आधीही तिथे अनेकजण येऊन रांगेत उभे होते.
बरोबर अडीच वाजता आम्हाला आत सोडण्यात आलं आणि तीन वाजता मंगलआरती सूरू झाली.
गाभार्यात अगदी समोर उभं राहायला मिळालं तरी गर्दी प्रचंड होती. त्यामुळे कधी गाभार्यातील पिंडीचं दर्शन व्हायचं तर कधी मध्येच समोर कोणाचं डोकं आलं तर समोरच्या भल्या मोठ्या स्क्रीनवर आरती पाहायला मिळत होती.
साग्रसंगीत सगळे विधी पाहायला मिळाले. आरती झाल्यावर अगदी गाभार्यात जाऊन मनाप्रमाणे दर्शन घेतलं.
मंदिराच्या आवारातच असलेली गणपती, शनि, शंकर, कार्तिकेय आणि इतरही काही मंदीरे पाहिली.
तिथेच बाजूला एक बुजवण्यात आलेली विहीर आणि नंदी आहे. मुघलांच्या आक्रमणावेळी ज्योतीर्लिंग वाचवण्यासाठी तिथल्या मुख्य पुजार्याने शिवलिंगासकट त्या विहिरीत उडी मारली होती आसे सांगितले जाते.
नंदीच्या तोंडाच्या दिशेलाच ज्ञानवापी मशीद आहे. तिथे खाली व्यासांची गुहा पाहिली आणि तिथेच काही मूर्त्या होत्या ज्यांची पूजा सुरू होती.
काशी विश्वेश्वराच्या जवळच अन्नपूर्णा मातेचंही सुरेख मंदिर आहे .
तिथेही छान दर्शन झालं. इथे सगळीचकडे वानरांचा प्रचंड सुळसुळाट आहे.
ते इतके माणसाळलेले आहेत कि तुमच्या हातातून फुलं फळं प्रसाद आणि काहीही काढून घेतात.
आम्ही दर्शनासाठी रांगेत उभं असताना तर काहीजणांच्या खांद्यावर उडी मारुन अगदी सहज पलिकडे जात होते.
तिथून मग आम्ही काशी विश्वेश्वराचा नविनच बनवलेला काॅरीडोर पाहायला गेलो. तिथे अजिबात गर्दीही नव्हती आणि इथे फोटो काढायला परवानगी होती. तेव्हा इथे सर्वांनी फोटो काढले आणि तिथून मग काळभैरवाच्या मंदिरात गेलो .
काळभैरवाला काशीचा कोतवाल म्हणतात . काशीकापुराधीनाथ म्हणून प्रसिद्ध असलेला हा काळभैरव इथल्या नागरिकांसाठी न्यायनिवाडा करतो अशी मान्यता आहे. त्याची परवानगी असेल तरच काशीत तुम्हाला प्रवेश मिळतो. इथे नैवेद्य म्हणून दारूचा भोग चढविण्याची पद्धत आहे.
अशाप्रकारे रात्रभर देवदर्शन करून परत बरीच तंगडतोड करत बसपर्यंत आलो आणि बसने हाॅटेलवर.
तिथे नाश्ता केला आणि लगेचच गयेला जाण्यासाठी परत बसमधून प्रवासाला सुरूवात केली.
बसमध्ये बसताच बहुतेक सगळेच दुसर्या क्षणाला गाढ झोपी गेले. दोन अडीच तासांनी सगळे आळोखेपिळोखे देत जागे झाले. पण गया यायला अजून बराच वेळ होता.
मग सर्वांनी गाणी म्हणायला सूरूवात केली, भेंड्या खेळलो आणि प्रवास सुरेल झाला.
मध्येच चहा प्यायला जेवायला थांबलो.
दुपारी गयाला पोचल्यावर हाॅटेलमध्ये चेक ईन केलं आणि लागलीच तिथला जगप्रसिद्ध 'द ग्रेट बुद्धा स्टॅच्यु' पाहायला गेलो.
८० फूट उंचीची ही गौतमबुद्धांची मूर्ती एका कमळात ध्यानस्त बसलेली आहे.
सॅन्डस्टोन आणि लाल ग्रॅनाईटच्या विटांनी बनलेला हा पुतळा त्या काळी म्हणजे १९९० च्या सुमारास बुद्धांचा विश्वभरातील सर्वात ऊंच पुतळा म्हणून ह्याची प्रसिद्ध होती.
'दाईबुत्सु' (म्हणजे जपानी भाषेत विशाल बुद्ध मूर्ती) म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या बुद्धाच्या चेहर्यावरील भाव अतिशय प्रसन्न समाधानी असून मूर्तीच्या चारही बाजूला जपानी बौद्ध शिष्यांच्या मूर्त्या आहेत .
विशेष म्हणजे प्रत्येक शिष्याच्या चेहर्यावरील सुरकुत्या, डोळ्यांचे आकार आणि डोळ्यातील भाव वेगळे होते.
त्यांचे वस्त्र जरी एकच असले तरी परिधान करण्याची प्रत्येकाची वेगळी आहे.
ह्यामुळे प्रत्येक मूर्तीतील वेगळेपण उठून दिसत होतं.
ह्या मंदीराचं उद्घाटन दलाई लामांच्या हस्ते झालेलं आहे.
इथून आम्ही बोधीवृक्ष पाहायला निघालो. वाटेत चहा प्यायला एका टपरीवर थांबलो. चहा पिता पिता त्या टपरीवाल्याशी सहज गप्पा सुरू झाल्या.
तो आम्हा सर्वांना त्याची जीरा बटर कुकीज घ्यायचा फारच आग्रह करू लागला.
मग सर्वांनीच दोनदोन कूकीज विकत घेतल्या. त्या कुकीजची चव खरच लाजवाब होती. बटरची हलकिशी नमकिन चव , त्यावर जीर्याची चव आणि अगदी हवा तितकाच गोडवा.
शिवाय तोंडात विरघळत होत्या त्या कुकीज .
त्या टपरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टपरीवर जवळजवळ सर्वच भाषांमध्ये टपरीचं नाव लिहीलेलं . अगदी संस्कृतमध्ये सुद्धा होतं . फक्त मराठीतून लिहीलं नव्हतं.
चौकशी केल्यावर कळलं कि टपरीवाल्याला स्वतःला ह्या सगळ्या भाषा येत होत्या .
मग त्याला मराठी येतं का विचारलं तर आमच्याकडे तोडक्यामोडक्या
मराठीतून दोन तीन वाक्य बोलला.
त्याने आम्हाला शब्द दिला कि आम्ही परत तिथे येऊ तेव्हा त्या टपरीवर मराठीतूनही नाव लिहीलेलं असेल.
तिथली आणखी एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे दिव्यांग लोकांसाठी टपरीवर मोफत चहासेवा उपलब्ध आहे असा लिहीलेला बोर्ड. त्याचा साधा बोलघेवडा स्वभाव आणि मनाची ही श्रीमंती पाहून खूप छान वाटलं.
इथून आम्ही ताजेतवाने होऊन बोधीवृक्ष पाहायला गेलो.
ह्याच वृक्षाखाली बुद्धाला ज्ञानप्राप्ती होऊन आत्म साक्षात्कार झाला होता.
पण हा तो मूळ पिंपळ वृक्ष नसून त्याच वृक्षाचा वंशज आहे असे कळले.
मूळ पिंपळ वृक्षाचे खोड सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तिथे नेऊन लावले होते.
तिथला वृक्ष फोफावल्यानंतर त्याचे खोड परत इथे आणून लावण्यात आले अशी माहिती आम्हाला मिळाली .
त्या वृक्षाच्या आजूबाजूला आणि त्या संपूर्ण परीसरातच अनेक बौद्ध भिख्खू ध्यानस्थ बसले होते. काहीजण प्रार्थना करत होते. काही लोटांगण घालत होते.
त्यांना तिथे राहून निवांतपणे ध्यान करता यावे म्हणून अनेक छोट्या राहुट्या बांधलेल्या होत्या.
एकूण वातावरण अतिशय शांत, प्रसन्न आणि पवित्र होतं.
इथेही ध्यानस्थ बुद्धाची सुरेख मूर्ती आहे. असं म्हणतात कि इथली बुद्धाची मूर्ती त्याच अवस्थेत आहे ज्या अवस्थेत बसून त्यांनी तपस्या केली होती.
सारं काही फिरून आम्ही हाॅटेलवर आलो, गरमागरम जेवणावर ताव मारला आणि डाराडूर झोपी गेलो.

(क्रमशः)
©नयना पिकळे

अयोध्यायात्रा आणि त्रिस्थळी - भाग २

  दुसरा दिवस

दुसर्या दिवशी पहाटे लवकर उठून आम्ही गंगास्नानासाठी अस्सी घाटावर गेलो. सहा वाजताच तिथे आम्ही पोचलो.
आमच्या आधीही तिथे बरीच जणं आली होती तरी आम्हाला वाटलेलं तशी खूप गर्दी नव्हती.
समोर नुकताच सूर्याचा लालसर गोळा गंगामैय्याच्या उदरातून बाहेर येत होता.
कालची संध्याकाळ अजूनही नसानसात भरलेली होती. काल संध्याकाळी पाहिलेले पक्षीच आताही थव्याथव्याने पाण्यात डुंबत होते, इथून तिथे उडत होते. काही जण त्यांना खायला देत होते आणि पक्षीही नेहमीची सवय असल्यासारखे अगदी न घाबरता त्यांच्या हातातून चोचीने खात होते.
बाजूलाच कोणी पुजा करत होतं तर कोणाचे मंत्रपाठ चालू होते. पहाटेचा गारवा असला तरी बोचरा नव्हता तर तनामनाला प्रफुल्लित करणारा होता. पाणीसुद्धा वाटले तितके गार नव्हते . आमच्यातील काहीजणांनी गंगेत डुबकी मारली .
आम्हाला मात्र डुबकी मारण काही जमलं नाही. ओलेत्याने थंड वार्यात सर्दी झाली असती तर पुढच्या सर्वच सहलीवरून पाणी फिरलं असतं म्हणून मी सतीश आणि इतर काही जणांनी फक्त गंगेच्या पवित्र पाण्यात पाय बुडवले आणि प्रोक्षण केलं.
नंतर तिथेच बाजूला गरमागरम कुल्हड चहा घेतला.
घाटावरच एकिकडे काहीजण आपली कला सादर करत होते. एका ८/१० वर्षांच्या मुलीने अतिशय सुरेल आवाजात गाणे म्हटले, इतर काही जणांनी विनोदी खुमासदार किस्से सांगितले .
तिथे 'काशी साहित्य कला उत्सव' सुरू असल्याचा बोर्ड लावला होता. कोणालाही आपली कला सादर करायची परवानगी होती.
मग आमच्यातील सुप्रियाताई आणि अविनाश भाऊजींनी सुद्धा सुरेख भक्तिगीते म्हटली.
तिथून मग आम्ही हाॅटेलवर परतलो आणि नाश्ता करून बसने पुढील सहल सुरू केली.
सर्वात आधी बनारस हिंदु युनिव्हर्सिटी पाहायला गेलो.
ह्या विश्वविद्यापीठाची स्थापना १९१६ साली महामाना पंडित मदन मोहन मालवीय ह्यांच्या हस्ते झालेली. ह्या विश्वविद्यालयाचे आवार इतकं प्रचंड आहे कि आम्ही बसमधूनच सगळे विभाग पाहिले.
प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मोठमोठ्या इमारती आहेत. त्यांचे ग्रंथालय अतिशय जुने असून तिथे जवळजवळ दहा लाखाच्या वर ग्रंथ आहेत. त्यापैकी अनेक ग्रंथ दुर्मिळ आहेत.
हे विद्यापीठ भारतातील तिसरे सर्वात मोठे विद्यापीठ आहे.
तिथून मग आम्ही दुर्गाकुंड मंदिरात गेलो. १८ व्या शतकातील हे मंदिर लाल दगडांनी बांधलेलं आहे. देवी इथे स्वतः प्रकट झाल्याने इथे तिची मूर्ती नसून यंत्ररूपातील तिच्या प्रतिकाची इथे पूजा होते.
मंदिराच्या परिसरात काळभैरव, कालीमाता वगैरेंची सुद्धा लहान मंदिर आहेत. मंदीराच्या आवारात अनेक ठिकाणी होमहवन सुरू होते.
काहीजण हात पाहून ज्योतीष सांगत होते. तर काही ठिकाणी तांत्रिकांची साधना सुद्धा चालू होती. तंत्र साधनेसाठी शाक्तपंथींमध्ये हे मंदिर फार महत्त्वाचे असल्याचे कळले.
तिथून मग संकटमोचन हनुमान मंदिर पाहिले. तुलसीदासांनी रामचरित मानस लिहील्यानंतर मारूतीरायाने त्यांना इथे ह्याच ठिकाणी दर्शन दिले होते.
इथेसुद्धा हनुमान प्रकट झाले म्हणून त्यांची मानवनिर्मित मूर्ती नाही तर स्वयंभू आकृती आहे. ही आकृती पूर्णपणे मातीची बनलेली आहे.
तुलसीदासांनी बांधलेल्या ह्या मूळ मंदीराचा जीर्णोद्धार १९०० साली मदन मोहन मालवीय ह्यांनी केला.
इथे मारूतीरायाला शुद्ध तुपातील बेसन लाडवांचा भोग चढवला जातो.
तिथून आम्ही तुलसी मानस मंदिर पाहायला गेलो. हे संगमरवरी मंदिर तुलसीदासांनी ज्या ठिकाणी रामचरितमानस लिहीले तिथेच बांधले आहे.
इथे तळमजल्यावर राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या मूर्त्या आहेत .
एका बाजूला माता अन्नपूर्णा आणि शंकराचे मंदीर आहे तर दुसर्या बाजूला सत्यनारायणाचे मंदिर आहे.
पहिल्या मजल्यावर तुलसीदासांची ध्यानमग्न मूर्ती आहे. मंदिराच्या चारीबाजूंनी भिंतींवर संपूर्ण रामचरितमानस लिहिलेले आहे .
रामायणातील काही महत्त्वाचे प्रसंग रेखाटलेले आहेत.
वरच्या मजल्यावर एका खोलीत दहा रूपये तिकीट घेऊन श्रीरामलीला आणि श्रीकृष्णलीलेचे चलचित्र दाखविण्यात येत होते .
आमच्या पैकी वर गेलेल्या माधुरी ताईंनी ही बातमी सांगितली. पण हा कार्यक्रम अर्ध्या तासाचा होता आणि आमचा पुढचा कार्यक्रमही भरगच्च असल्याने तितका वेळ आमच्याकडे नव्हता. त्यामुळे कोणीही वरती गेलो नाही .
इथून मग आम्ही सारनाथला जायला निघालो. सारनाथला पोचेतो दुपार झाली आणि सर्वांना भुका लागल्या होत्या. पण जवळपास एकही ढाबा किंवा साधेसे हाॅटेलही नव्हते .
मग काहीजणांनी तिथल्या फळवाल्यां कडून फळं विकत घेऊन खाल्ली.
मी शहाळ्याचं पाणी प्यायले आणि चमचमीत काही नको म्हणून फक्त बनमस्का खाल्ला. काहिंनी तिथेच रस्त्याच्या कडेवर असलेल्या ठेल्यावर चाट खाल्ला, बॅगेत असलेले चिवडा लाडू बाहेर आले आणि अशा प्रकारे सर्वांनी पोटं भरून घेतली.
आणि मग आम्ही स्तूप पाहायला निघालो. बाहेरच अनेक छोटेमोठे स्टाॅल्स होते .
त्यात बनारसी सिल्कच्या वेगवेगळ्या आकाराच्या बॅग्स, पर्सेस, बुद्धाच्या मूर्त्या आणि असे बरेच काही होते.
तिथे सर्वांनीच काहीना काही खरेदी केली.
सारनाथ हे बौद्धधर्मियांसाठी अतिशय महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे . कारण आत्मसाक्षात्कार झाल्या नंतर गौतमबुद्धांनी
सर्वप्रथम उपदेश इथेच केला होता.
सम्राट अशोकाने बौद्धधर्म स्वीकारल्या नंतर अनेक स्तूप निर्माण केले त्यातलाच हा एक महत्त्वाचा स्तूप.
हा स्तूप अष्टकोनी असून याचे बांधकाम विटांनी केलेले आहे. स्तूपाच्याच अगदी बाजूला एक शिवमंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला जैनांचे ११ वे तिर्थंकर श्रेयांस यांचे एक जैनमंदिर सुद्धा आहे.
तिथलाच एक गाईड आम्हाला त्या स्तूपाची, तिथल्या परिसरातील उत्खननात सापडलेल्या सर्व अवशेषांची आणि मूर्त्यांची इत्थंभूत माहिती देत होता. गौतम बुद्धांचा संपूर्ण जिवनकाळच त्याने आमच्यासमोर कथनस्वरूपात साकारला.
तिथेच केवळ आपल्या भारताचीच नव्हे तर संपूर्ण विश्वाची शान असणारा अशोकस्तंभ ठेवलेला आहे. मूळ स्तंभ ५५ फुट ऊंच होता. पण आज तिथे फक्त साडेसात फुटाचा स्तंभाचा तुटलेला तुकडा ठेवलेला आहे.
ह्या स्तंभावर तीन वेगवेगळ्या ऐतीहासिक काळातील तीन लेख कोरलेले आहेत.
सम्राट अशोकच्या काळातील पहिला लेख ब्राह्मी लीपीत आहे. दुसरा लेख कुषाण काळातला आणि तिसरा गुप्त काळातला लेख आहे.
उत्खननात सापडलेल्या वस्तूंचे तिथेच एक संग्रहालयही आहे.
वरील स्तंभाचा वरचा भाग ह्या संग्रहालयात ठेवलेला आहे. सॅंडस्टोनच्या बनलेल्या ह्या स्तंभावर आज इतक्या शतका नंतरही अतिशय सुरेख चकाकी आहे. पण ही चकाकी कशामुळे आहे, त्यासाठी कोणते द्रव्य किंवा तंत्र वापरले आहे ते आजपर्यंत कळलेले नाही.
कारण त्या काळाच्या आधी किंवा नंतर कधीच अशाप्रकारचे तंत्र वापरलेली कोणतीही वस्तू आजवर सापडलेली नाही. अनेकांनी ह्यावर संशोधन केले आणि आजही कित्येक जण संशोधन करतच आहेत.
आमचा गाईडने प्रचंड अभिमानाने आणि कौतुकाने सगळं काही छान समजावून सांगितलं. स्तूप , संग्रहालय, आजूबाजूचा बगीचा, स्वच्छ निवांत परिसर सारं काही पाहून झालं पण तोवर माझ्या पोटातलं शहाळ्याचं पाणी घिरट्या घालायला लागलं होतं आणि डोकं दुखायला सुरूवात झाली होती.
आम्ही सगळे बसमध्ये बसलो. हाॅटेलवर परतताना प्रज्ञाने एका बनारसी साड्यांच्या फॅक्टरी आउटलेट समोर बसेस थांबवल्या.
इथून ज्यांना खरेदी करायची होती त्या दुकानात थांबल्या आणि दुसर्या बसने बाकीचे हाॅटेलवर परतले.
मला तरी काहीही घ्यायचं नव्हतं आणि बरंही वाटत नव्हतं त्यामुळे मी रूमवर येऊन सरळ सात वाजताच झोपी गेले.
कारण त्या रात्री आम्हाला साडेबाराला उठायचं होतं. हो बरोबर ऐकलंत. रात्री साडेबारालाच .

(क्रमशः)
© नयना पिकळें

ताडोबा - जंगल सफारी

   ह्यावर्षीच्या जीवघेण्या उकाड्यात कुठे बाहेर जाणं तर सोडाच पण घरच्या घरीही गरमीचा त्रास सहन होत नाही. अशातच जर नागपूरला जायचा बेत ठरत असेल...